Chhatrapati Sambhaji Nagar News : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या विषयी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान शिरसाट यांच्या विरोधात मंगळवारी ठाकरे गटाच्या महिला आघाडीने शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. त्यामुळे आता शिंदे गटाच्या महिला आघाडी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. तर आज (29 मार्च) रोजी साडेअकरा वाजता शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी पोलीस आयुक्त कार्यालयात जाणार आहे. तसेच शिरसाट यांच्याविरुद्ध जोडे मारो आंदोलन करणाऱ्या महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करणार आहे. त्यामुळे शिरसाट यांच्या वक्तव्यावरून आता शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा वाद आता विकोपाला गेला आहे.
सुषमा अंधारे यांच्याबद्दल आमदार संजय शिरसाट यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळवारी शिरसाट यांच्या फोटोला ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शिरसाट यांच्या विधानामुळे ठाकरे गटाच्या महिला आघाडीमध्ये असंतोष देखील पाहायला मिळाला. त्यामुळे ठाकरे गट शिवसेना महिला आघाडीच्यावतीने शहरातील क्रांती चौकात आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध जोरदार निदर्शने करण्यात आली. तर शिरसाट यांच्या फोटोला जोडे मारून, यावेळी संजय शिरसाठ यांचे करायचे काय, खाली मुंडकं वर पाय.... मिंधे सरकार हाय, हाय, ….शिंदे सरकार करायचं काय,खाली मुंडके वर पाय, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे आता शिरसाट समर्थक आणि शिंदे गटाच्या महिला आघाडी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.
पोलीस आयुक्तांची भेट घेणार...
सुषमा अंधारे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून होणाऱ्या आरोपाला खुद्द आमदार शिरसाट यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन, उत्तर दिले आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरातील शिंदे गटाच्या शिवसेना महिला आघाडी आज शहर पोलीस आयुक्तांची साडेअकरा वाजेच्या सुमारास भेट घेणार आहे. तसेच शिरसाट यांच्याविरुद्ध मंगळवारी ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनकर्ते महिला कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आयुक्त यांच्याकडे करणार आहेत.
अन्यथा राजीनामा द्यायला तयार...
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबद्दल 'अश्लील' वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र सर्व आरोप शिरसाट यांनी फेटाळून लावले आहे. मी केलेल्या भाषणात कुठेही 'अश्लील' वक्तव्य आल्याचे दाखवून दिल्यास, मी स्वतः हून माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे. तर उगाच माझ्यावर खोटे आरोप केल्यास जशास तसेच उत्तर मिळेल, त्यासाठी माझी आमदारकी गेली तरीही चालेल असेही शिरसाट म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
Sushma Andhare : 48 तासांत संजय शिरसाट यांच्यावर कारवाई करा; ठाकरे गटाचं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तालयात