Nashik Pihu Rayma Shaikh : लहान मुलांच्या टॅलेंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) आपण पाहातच असतो. अनेकजण कुणी वाद्य वाजवत, कुणी अभिनय करून दाखवत, कुणी नृत्यात पारंगत असत. म्हणजे अगदी लहान वयापासून मुलांना जर योग्य संस्कार मिळाले तर कमी वयातच मुले प्रसिद्ध होतात. याचा प्रत्यय नाशिक शहरात एका कुटुंबीयांना आला आहे. अवघ्या सहाव्या वर्षी पिहू उर्फ रायमा शेख या चिमुरडीने तब्बल पंधरा भाषांमध्ये गाणी गायचं कौशल्य आत्मसात केले आहे. आपल्या गोड आवाजात अस्खलितपणे गाणारी पिहूचे नाव 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'वर कोरले गेले आहे. 


नाशिक (Nashik) शहरातील मुंबई नाका परिसरात सहा वर्षीय पिहू उर्फ रायमा (Pihu Rayma Shaikh) राहते. लहानपणापासूनच तिला गायनाची आवड आहे. दीड वर्ष वय असताना देखील बोबड्या बोलात ती म्युझिकसह गाणे म्हणत असायची. हळूहळू आई वडिलांनी तिला बडबडगीते, बालगीते शिकवण्यास सुरुवात केली. आज ती पंधरा भाषांत गाणी गात आहे. रायमाला गाण्याची मनापासून आवड असून त्यातही लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची बहुतांश गाणी ती गाते. आईप्रमाणेच तीही लतादीदींची मोठी चाहती आहे. ती निव्वळ पाठांतर करून गाते असे नव्हे तर, प्रत्येक भाषेतील गाणे हे त्या गाण्याच्या शैलीतून, देहबोलीतून रसिकांपुढे मांडण्याचा तिचा पूर्ण प्रयत्न असतो.


पिहूची आई वृषाली म्हणतात की, 'लहान असताना तिला झोपवण्यासाठी अंगाई गात असू, कधी कधी लता मंगेशकर यांचे गाणे गायले जायचे. यातूनच तिच्या कानावर हळूहळू संगीत पडत गेले. त्यामुळे ती शिकत गेली. तर मराठी हिंदी गाणे यायला लागले, मग हळूहळू लता मंगेशकर यांच्यापर्यंत पोहचणायसाठी दीदींनी गायलेल्या इतर भाषांतील गाणे शिकण्याचा प्रयत्न सुरु झाला. अशातूनच पिहू आतापर्यत पंधरा भाषांत गात असल्याचे तिच्या आईने सांगितले. यात मराठी, गुजराती, संस्कृत, भोजपुरी, कोकणी, तमिळ, मल्याळम, इंडोनेशियन, इंग्रजी, मैथिली, बंगाली, पंजाबी, राजस्थानी, उर्दू, हिंदी या सर्व भाषांचा समावेश आहे. ती प्रत्येक भाषेतील गीत हे मातृभाषेतीलच गीत गात असल्याच्या सहजतेने व त्याच भाषेच्या उच्चारशैलीत गात असते. तिच्या या तोंडपाठ असलेल्या गाण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.


पिहू सध्या रवींद्रनाथ टागोर शाळेत सिनिअर केजीमध्ये शिकत असून सर्वात पहिले तिने 'ए मेरे वतन के लोगो' गाणे गायले होते. तर सुरेश वाडकर, शंकर महादेवन लता मंगेशकर हे गायक तिला आवडतात. पिहू पाच वर्षाची असताना तिच्या या कौशल्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्ने घेतली आहे. वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच रायमाने गायला सुरुवात केली. अनेक कार्यक्रमांमध्ये सुरेल गायन करून ती रसिकांची मने जिंकत असते. आई वृषाली आणि वडील रज्जाक यांच्या प्रोत्साहनामुळे रायमाची ही गायनाची कला बहरत आहे. रायमा पन्नासहून अधिक गाणी कुठेही न अडखळता अस्खलितपणे गात असून सध्या तिने संगीताचे क्लास देखील लावल्याचे आईवडिलांनी सांगितले. 


आई वृषाली अंध रेडिओ अँकर... 


विशेष म्हणजे, रायमाच्या आई वृषाली यांच्या नावावरही गाण्या विषयीचे विविध विक्रम आहेत. कारण पिहूला संगीत शिकवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. पहिली अंध रेडिओ अँकर' म्हणून त्यांची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'सह 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स', 'गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, 'ॲसेट बुक ऑफ रेकॉर्ड्स' अशा विविध 'रेकॉर्ड बुक्स'मध्ये झालेली आहे. तर रायमाचे वडील रज्जाक शेख यांची जाहिरात-कंपनी असून ते रेडिओसाठी आणि टीव्हीसाठी जाहिराती तयार करतात. प्रसारित करतात. या शिवाय ते लघुचित्रपट व चित्रफितीही तयार करतात. यातून वेळ काढून ते पिहूला संगीत शिकवत असतात.