Nashik News : नाशिकच्या गिर्यारोहक प्रेमींसाठी दुःखद घटना घडली असून गिर्यारोहणासाठी (Climbing) गेलेल्या एका ट्रेकरचा माळशेज घाटातील चोरदरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिकचे प्रसिद्ध ट्रेकर म्हणून ओळख असलेले किरण काळे (Kiran Kale) यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
नाशिक (Nashik) शहरातून ट्रेकिंगसाठी काही जणांचा ग्रुप (Trekkers) गेला होता. पुण्याजवळील कल्याण-नगर रस्त्यावरील माळशेज घाट (Malshej Ghat) परिसरात हा ट्रेकिंग ग्रुप चढाई करत असताना ही घटना घडली. दुपारच्या सुमारास घाटमाथ्याकडे असताना माळशेज घाटातील चोरदरीची अवघड वाट चढत असताना अचानक किरण काळे यांचा तोल गेला. ते थेट दरीत कोसळले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि वन्यप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत अनेकजण दरीत अडकून होते, त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
माळशेज परिसरात नाणेघाट भागात चोरदरीत नाशिकहून बारा गिर्यारोहकांचा एक गट ट्रेकिंगसाठी गेला होता. नेहमीप्रमाणे या सर्वांनी चढाईसाठी सुरुवात केली. दुपारच्या सुमारास घाटमाथ्यावर असताना चोरदरी घाट चढत असताना अनेक गिर्यारोहक अडकून पडले. याचवेळी किरण काळे हे देखील यांच्यात होते. काळे यांचा यावेळी तोल गेल्याने ते दरीत कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर स्थानिक पोलिसांनी धाव घेत इतर अडकून पडलेल्या गिर्यारोहकांची यशस्वी सुटका केली. याबाबत मुरबाडचे तहसीलदार संदीप आवारी यांनी माहिती दिली.
किरण काळे हे नाशिकमधील प्रसिद्ध गिर्यारोहक म्हणून सर्वपरिचित होते. मात्र ट्रेकिंग करताना त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. ट्रेकर्स आणि दुर्गभ्रमंती करणाऱ्या संस्थांनी काळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. काळे यांचे पार्थिव रात्री उशिरा नाशिकमध्ये आणण्यात आले. काळे यांच्यासोबत गेलेले इतर गिर्यारोहक सुखरूप असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. रात्री उशिरापर्यंत स्थानिक पोलिस आणि प्रशासनाचा तपासासह इतर कार्यवाही सुरू होती.
यापूर्वीच्या जिल्ह्यातील दुर्घटना...
गेल्या काही वर्षात ट्रेकिंग करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच ट्रेकिंग करताना अनेकदा अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले आहे. यापूर्वी जुलै 2022 मध्ये शिवकालीन साल्हेर किल्ल्यावर मालेगाव येथील 12 मित्र पर्यटनासाठी गेले होते. किल्ल्यावर ट्रेकिंग करत असताना पाय घसरल्याने दोन तरुण दरीत कोसळले. या दुर्घटनेत भावेश अहिरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर मनीष मुठेकर हा तरुण जखमी झाला होता. तर 2020 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडावर नवीन वाट शोधताना जगप्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृत्यू झाला होता. तसेच 2018 मध्ये त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर गडावरही पाय घसरून दरीत पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.