North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी वाचा इथे...

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Mar 2024 06:22 PM
Dhule News : धुळ्यात कॅफेवर पोलिसांचा छापा

धुळे शहराच्या देवपूर परिसरातील स्वामी नारायण मंदिर रोड वरील एका कॅफेवर पोलिसांनी धाड टाकली आहे. याप्रकरणी महाविद्यालयातील आठ तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच कॅफे मालकाची देखील चौकशी करण्यात येत आहे.

विखे पाटलांविरोधात शिर्डीत भाजपच्या युवा नेत्यांचा मोर्चा

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर कोपरगाव मतदारसंघातील भाजप युवा नेते विरुद्ध पालकमंत्री विखे यांच्यातील कलह अनेकदा समोर आला आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कोल्हे यांच्या गटाच्या असणाऱ्या ग्रामपंचायतींना पालकमंत्री निधी देताना दूजाभाव असल्याचा आरोप करत युवा नेते विवेक कोल्हे यांनी आज मोर्चा काढून भाजपच्याच पालकमंत्र्यांवर टीका केली आहे.

चार हजारांहून अधिक नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डाचे मोफत वाटप

धुळे : शासनामार्फत गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना महागडे वैद्यकीय उपचार मोफत मिळावेत या उद्देशाने आयुष्यमान भारत कार्ड ही योजना सुरू करण्यात आली आहे, या योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंतचा वैद्यकीय खर्च हा मोफत केला जातो. गोरगरीब नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने धुळ्यातील डॉक्टर विलास बच्छाव यांनी एकाच दिवशी तब्बल 4000 नागरिकांना या  कार्डाचे वाटप केले आहे. डॉक्टर विलास बच्छाव यांची आरोग्य दूत म्हणून धुळे जिल्ह्यात ओळख असून आपल्या वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत विविध उपक्रम राबविले आहेत. आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्यासाठी नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन डॉक्टर विलास बच्छाव यांच्या वतीने  आयुष्यमान भारत कार्ड वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. नागरिकांना आयुष्यमान भारत कराडचे तात्काळ वितरण करण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे

शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ थोड्याच वेळात मुंबईला रवाना, मुख्यमंत्र्यांसोबत सायंकाळी बैठक

गेल्या पाच दिवसांपासून नाशिकमध्ये माकप आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा होणार आहे. 11 जणांचे शिष्टमंडळ थोड्याच वेळात मुंबईकडे होणार रवाना आहे. आजच्या बैठकीत तोडगा निघणार का? हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.

दुसऱ्या दिवशीही सिटीलिंकचे वाहक संपावर, नाशिककर त्रस्त 

Nashik News नाशिक : सिटी लिंक बससेवा (Nashik Citylink Bus Service) कालपासून पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. वाहकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडल्यामुळे त्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी काही भागातील सिटी लिंक बस सेवा ठप्प आहे. त्यामुळे नाशिककरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चार कोटींसाठी नाशिकच्या भागवत बंधूंचे अपहरण

येवला पंचायत समितीचे माजी उपसभापती व शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी रुपचंद भागवत (Rupchand Bhagwat) आणि त्यांचे बंधू विष्णू भागवत (Vishnu Bhagwat) यांचे 4 कोटी 10 लाख रुपयांच्या मागणीसाठी सीबीएस येथून बुधवारी रात्री अपहरण (Kidnapping) झाले होते. अपहरणकर्त्यांनी दोघांकडे पैशांची मागणी करून अहमदनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सोडून पळ काढला होता. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) एकाला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. 

पार्श्वभूमी

North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.