पुणे : राज्यात 18 आणि 19 नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार असून कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली आहे. त्यामुळे, ज्या शाळेत एकही शिक्षक उपलब्ध नसल्यास संबंधित शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले. शिक्षण आयुक्तालयाने 18, 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी शाळांना सुटी देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर केला होता. या अनुषंगाने शिक्षण विभागाचे (Education) उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक (Vidhansabha) 2024 सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत आयुक्त स्तरावरून आवश्यक त्या सूचना देण्याबाबत असे नमूद करण्यात आले. मात्र, या संदर्भात संभ्रम निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्याने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्टीकरण दिले.
मांढरे दिलेल्या माहितीनुसार, 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते. शासनाने या संदर्भात परिपत्रकाद्वारे दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत. 18 आणि 19 रोजी सर्व शाळा सुरू राहतील. कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही अशा शाळाबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांचे अधिकारात सुट्टी जाहीर करावी अशा सूचना आहेत. त्यामुळे अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील.
मुख्याध्यापक निर्णय घेणार
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाची व संबंधित निवडणूक कर्मचाऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. त्यामुळे, 18, 19,20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीत शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यांमुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याबाबत सूचना देण्याच्या राज्य सरकारच्यावतीने शिक्षण आयुक्तांना विनंती पत्राद्वारे देण्यात आलं आहे. मात्र, या पत्रानुसार राज्यातील कुठल्याही शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे, संबंधित शाळेचे मुख्याध्यापकच शाळेला सुट्टी देण्याबाबतचा निर्णय घेतील, असेही शिक्षण आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
हेही वाचा
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात