HAL च्या नवा नियमामुळे नाशिकच्या विकासावर टाच? 20 किमी क्षेत्रात बांधकामासाठी ‘NOC’ अनिवार्य, नेमकं कारण काय?
Nashik News : ओझरच्या Hal च्या विमानतळापासून 20 किलोमीटरवर अंतराच्या क्षेत्रात बांधकामासाठी परवानगी घ्यावी लागणार असून बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Nashik News : गांधीनगर विमानतळ आणि आर्टिलरी सेंटरच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर, नाशिकमधील सुमारे निम्म्या भागातील बांधकामांवर मर्यादा येणार आहेत. यापूर्वी नाशिकरोड आणि देवळाली परिसरात पाच किलोमीटरपर्यंत उंच इमारती बांधण्यावर निर्बंध होते. आता हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने ओझर विमानतळाच्या 20 किलोमीटर परिघातील बांधकामांसाठी नव्या अटी घालून दिल्या आहेत.
या क्षेत्रातील उंच बांधकामे हवाई वाहतुकीस अडथळा ठरू शकतात, हे लक्षात घेता एचएएलकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) घेणे आता सक्तीचे करण्यात आले आहे. या संदर्भातील पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक महापालिका आणि नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (NMRDA) पाठवले आहे, त्यामुळे बांधकाम व्यवसायात एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे नाशिकमधील सुमारे 50 टक्के बांधकामांवर मर्यादा येणार असून, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या विविध विकास योजनांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
एचएएलच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
एचएएलच्या व्यवस्थापकांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पत्र पाठवून एचएएल विमानतळाच्या 20 किमी परिघातील बांधकामांवर मर्यादा घालण्याची विनंती केली आहे. या क्षेत्रात कोणतेही बांधकाम करताना ‘एचएएल’चा अभिप्राय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने नाशिक महापालिका आणि नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एनएमआरडीए) पत्र पाठवून संबंधित नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, किती उंचीच्या इमारतींना परवानगी द्यावी अथवा नाकारावी, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
पत्रात नेमकं काय आहे?
ओझर टाउनशिपमध्ये एचएएलचे विमानतळ असून, येथून सिव्हिल शेड्युल एअरलाइन्स, नॉन-शेड्युल्ड चार्टर्ड ऑपरेटर्स, व्हीव्हीआयपी फ्लाइट्स, फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन्स तसेच हिंदुस्थान एरोनॉटिक्स आणि इंडियन एअर फोर्सकडून चाचणी उड्डाणे केली जातात. या विमानतळाच्या आजूबाजूच्या 20 किलोमीटर परिघातील उंच बांधकामांमुळे भविष्यात विमानवाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे, या 20 किलोमीटर परिघात होणाऱ्या प्रत्येक बांधकामासाठी ‘एचएएल’चा अभिप्राय घेतल्याशिवाय परवानगी देऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे. या सूचनेनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाने नाशिक महापालिका आणि एनएमआरडीएला नियमांचे काटेकोर पालन करीत बांधकाम परवानग्यांची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
कोणाला बसणार फटका?
एचएएलच्या नव्या अटींमुळे नाशिकच्या सुमारे निम्म्या भागातील विकासावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. एचएएल विमानतळाच्या 20 किलोमीटर परिघात येणारे पंचवटी, म्हसरूळ, मखमलाबाद, आडगाव, उपनगर, द्वारका, सीबीएस आणि भाभानगर हे शहरातील प्रमुख भाग तसेच सिन्नर, पिंपळगाव बसवंत आणि दिंडोरीसारखे उपविकसित परिसर देखील या अटींच्या कक्षेत येतात. परिणामी, या भागांचा विकास अडथळ्यांत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आदेशामध्ये बांधकामासाठी नेमकी उंची किती मर्यादित असावी, याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे केवळ उंच इमारतींचेच नव्हे, तर सामान्य बंगले आणि घरांच्या बांधकामांनाही परवानगी मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा

















