नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील हत्यासत्र सुरूच असून तीन दिवसांत दोन खुनाच्या (Nashik Crime) घटनांनी शहर हादरले आहे. काही दिवसांपूर्वीच अंबड भागात एकाच दिवशी दोन तरुणांचा खून (Murder) करण्यात आल्याची घटना घडली होती. अशातच मंगळवारी होलाराम कॉलनी परिसरात प्रियकराने प्रेयसीला चाकूने भोसकले तर काल 17 ऑगस्ट रोजी सातपूर अंबड लिंक रोड भागात एका वीस वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 


नाशिकसह जिल्ह्यात सातत्याने गुन्हेगारीच्या (crime) घटना घडत असल्याने जिल्ह्याचं वातावरण पूर्णतः बिघडल्याच्या स्थितीत आहे. अशातच शहरात सातत्याने गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या घटना घडत असल्याने नाशिककरांना रस्त्यावरून चालणे मुश्किल झाल्याचे चित्र आहे. दिवसाढवळ्या खुनाच्या घटना घडत असल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. अशातच शहरातील होलाराम कॉलनी परिसरात खुनाची पहिली घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. विवाहित महिलेचा तिच्या प्रियकराने (Love Affair) खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी संशयितास पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाने पाणी न दिल्याने झालेल्या वादातून ही घटना घडली. श्याम अशोक पवार असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या घटनेत 29 वर्षीय विवाहित असलेल्या आरतीचा मृत्यू झाला आहे.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्याम पवार हा बिगारी काम करत होता तर मृत महिला धुणे भांडी करत होती. मंगळवारी श्याम पवार काम करुन रात्री आठ साडे आठ वाजेच्या सुमारास घरी आला. यावेळेस मुलाकडे त्याने पाणी मागितले. तो खेळत असल्यामुळे त्याने पाणी दिले नाही. त्यामुळे संतापात श्यामने या मुलाच्या मारले. यानंतर श्याम आणि आरतीमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर आरतीने शिवीगाळ करत श्यामला लाथ मारली. त्यानंतर संतप्त झालेल्या श्यामने जवळच पडलेला धारदार सुरा उचलून आरतीच्या पाठीत खुपसला. त्यात आरतीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडाचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर, निरीक्षक तुषार आढावू तसेच सहाय्यक निरीक्षक खैरणार, भोये आदींनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत संशयितास अटक केली.


तर दुसऱ्या घटनेत सिडको परिसरातील मयूर केशव दातीर या युवकाची निर्घृण हत्या (Youth Murder) झाल्याची घटना घडली. अंबडच्या स्वामी नगरातील समाज मंदिर परिसरामध्ये हा खून झाला. आठ दिवसापूर्वीच संजीव नगर भागात दोन युवकांचे खून झाले होते. त्यानंतर ही घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली. दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन प्राणघातक हल्ल्यात झाले. करण कडुसकर, रवी आहेर, मुकेश मगर यांनी धारदार शस्त्राने मयूर दातीर याच्या छाती व पोटावर वार केले. हे घाव वर्मी बसल्याने मयूरचा जागीच मृत्यू झाला. यातील करण कडुसकर याच्यावर खून, घरफोडी सह 18 गुन्हे दाखल आहेत. तर मुकेश मगर याला हद्दपार करून अहमदनगर जिल्ह्यात सोडण्यात आले होते.


कठोर कारवाई गरजेची 


नाशिक शहरात सातत्याने खुनाच्या, मारहाणीच्या, वाहन जाळपोळीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. त्याचबरोबर रोजच प्राणघातक हल्ल्यानी शहर हादरत आहे. खुनाचे, वाहन तोडफोड जाळपोळच्या घटनांचे सत्र बघून पोलिसांनी यावर धडक मोहीम राबविण्याची गरज आहे. तात्पुरती कारवाईने संशयित धजावत नसल्याचे या घटनांवरून दिसून येते.  मागील तीन दिवसात जिल्ह्यात तीन खुनाच्या घटना उघडकीस आल्याने पोलीस प्रशासन हातावर हात धरून बसले की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. यातही पोलीस संशयितांना काही दिवसातच ताब्यात घेत असताना घटना मात्र घडतच आहेत, त्यामुळे संबंधित संशयितांना कठोर कारवाई केल्यास कुणी अशा घटना करण्यास धजावणार नाही, मात्र चित्र याउलट असल्याचे दिसते आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nashik Crime : साडूनेच काढला माजी सरपंच साडूचा काटा, सुरगाणा तालुक्यातील घटना, दोघी बहिणींवर वार