नाशिक : नाशिकच्या (Nashik) सुरगाणा तालुक्यात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. तालुक्यातील सूर्यगड येथील माजी सरपंचाची साडूनेच हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे, तसेच मेहुणीसह बायकोवरही कुऱ्हाडीने वार केल्याने त्या दोघीही गंभीर जखमी असल्याचे समजते.


सुरगाणा शहरापासून जवळच असलेल्या सूर्यगड येथील माजी सरपंच मनोहर राऊत यांची हत्या त्यांच्याच साडूने केल्याची घटना काल (16 ऑगस्ट) पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान घडली आहे. तर मयत राऊत यांची पत्नी आणि आरोपीची पत्नी या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत मयताची मुलगी रोशनी राऊत हिने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यात म्हटले आहे की, माझे काका संशयित आरोपी पळसण येथील भास्कर परशराम पवार यांचे कुटुंब नातेवाईक असल्याने आमच्याकडे राहत होते. त्यांना त्यांचा चुलता हिरामण पवार हा त्रास देत असल्याने ते मनोहर राऊत सहा महिन्यांपासून राहत होते. 


दरम्यान सहा सात महिने झाल्याने हातरुंडी येथील मामा प्रकाश महाले यांनी सांगितले की आता त्यांना मूळगावी पायरपाडा येथे पाठवून द्या. तोच निरोप मनोहर राऊत काका आणि मावशी यांना सांगितला, की तुम्ही आता तुमच्या गावी निघून जा, याचा राग भास्कर पवार यांना आला. तोच राग मनात धरुन पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भास्कर पवार याने मनोहर राऊत उजव्या खांद्याच्या मानेजवळ, हनुवटी आणि छातीवर वार केले. तर आई आणि मावशीच्या हातावर कुऱ्हाडीने वार करुन जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटना घडत असताना भास्कर पवार यांचा मुलगाही धावत आला, त्याने संशयितास पकडून ठेवत कुऱ्हाड बाजूला फेकून दिली. घटनेची माहिती सुरगाणा पोलिसांना देण्यात आली, तातडीने पोलिसांनी घटनास्थळ गाठत घटनेचा पंचनामा केला. 


पोलिसांकडून संशयित ताब्यात


याबाबत पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल आहेर हे पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत. यापैकी मयत मनोहर राऊत यांची पत्नी भारती राऊत यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. राऊत यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.


हेही वाचा


Dindori Crime : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात 'खून का बदला खून', घरातील सदस्याला संपवल्याच्या रागात तरुणाला संपवलं!