Nashik Unseasonal Rain : नाशिक (Nashik) जिल्ह्यात शनिवारी सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात कालच्या अवकाळी पावसात जिल्ह्यातील पाच जनावरे दगावली असून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामानासह सायंकाळी अवकाळी पावसाचे आगमन होत आहे. यामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. शनिवारीदेखील नाशिकसह जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शहरसह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावत गारपीट झाली. या गारपिटीमुळे रब्बी पिकांना चांगलाच फटका बसला असून अनेक भागात शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशातच पेठसह नांदगाव, नाशिक आणि मालेगावात वीज पडून दोन बैल, तीन गायींचा मृत्यू झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे.
अवकाळी पावसाने (Unseasonal rain) शेतकऱ्यांची झोप उडवली असून जिल्ह्यातील चांदवड, येवला, निफाड, बागलाण, सटाणा देवळा आदी तालुक्यात कांद्यासह द्राक्ष बागांचे (Grapes Farm) प्रचंड नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यातील कुंभारी, पंचकेश्वर, वनसगाव, उगाव, देवपूर, ब्राह्मणगाव, रानवड आदी भागांत पंधरा मिनिटे गारपीट झाल्याने कांदा, द्राक्षबागा संकटात सापडल्या, तर येवला, नांदगाव, देवळा तालुक्यात कांद्यासह मका, गहू, डाळिंबाचे प्रचंड नुकसान झाले आहे. गारपिटीचा फटका कांद्याच्या पातीवरच बसल्याने वाढ खुंटण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यात मराठवाडा, विदर्भात गारपिटीने जोरदार तडाखा दिला आहे. या संकटगारांमुळे बळीराजाचे हिरवे स्वप्न भंगले आहे.
द्राक्षबागांवर परिणाम....
अवकाळीच्या वातावरणाने द्राक्षबागांवर गारांच्या तडाख्याने घडांना तडे गेले आहेत. कांदा, गहू, द्राक्ष आदी पिके भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत. निफाडमध्ये 24 हेक्टर कांदा, एक हेक्टर गहू, तर प्रत्येकी दोन हेक्टरवर फळपीक आणि मक्याचे नुकसान झाले आहे. मनमाड येथे सलग तिसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. येवला तालुक्यात रब्बी हंगामातील अनेक पिकांची नासधूस झाली. पश्चिम भागातील खर्डे, शेरी, कनकापूर, वार्शी व हनुमंतपाडा परिसरातही अवकाळी पाऊस झाला. अर्धा तास झालेल्या पावसात कुठे दहा मिनिटे, तर कुठे पंधरा ते वीस मिनिटे गारांचा तडाखा बसला. नुकसानग्रस्त शेतमालाचा सरकारने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.