Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यावर शोककळा पसरली असून येवला तालुक्यातील (Yeola Taluka) जवानास वीरमरण प्राप्त झालं आहे. तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जवान राजस्थानमधील (Rajasthan News) गंगानगर येथे कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आलं. अजित गोरख शेळके असं या जवानाचं नाव आहे. देशाचं संरक्षण करत असलेल्या जवानाचं निधन झाल्यानं येवला तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
राजस्थान राज्यातील गंगानगर येथे सेवेत असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र अजित शेळके (Ajit Shelke) शहीद झाले आहेत. येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक हे त्यांचं गाव होतं. त्यांच्या निधनाची बातमी कळताच गावावर शोककळा पसरली आहे. अजित शेळके यांचे वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी वीरमरण आले आहे. अजित हे ड्युटीवरून घरी जात असताना युनिटमध्ये अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
दरम्यान, अजित शेळके यांच्या निधनाने नाशिक जिल्ह्यासह येवला तालुक्यावर शोककळा पसरली आहे. येवला तालुक्यातील मानूर बुद्रुक येथील ते रहिवासी होते. परिसरात अजित हे अत्यंत ओळखीचे होते. त्यांचा मनमिळावू स्वभाव असल्याने असंख्य मित्रपरिवार आहे. दरम्यान अजित यांचे पार्थिव सोमवारपर्यंत त्यांच्या गावी येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रप्रेमासाठी स्वत: चे जीवन समर्पित करुन आमच्या शेळके परिवारातील युवकाने वीरमरण पत्करुन भारत मातेच्या चरणी आपले आयुष्य समर्पित केले. अजित यांना लहानपणापासून देशसेवेची आवड होती. शिक्षण सुरू असताना त्याचा कल सैन्यदलाकडे होता. काही वर्षांपूर्वीच त्यांची सैन्यदलात निवड होऊन ते देशसेवा करत होते. मात्र वयाच्या 29 व्या वर्षी शहीद झाल्याने येवला तालुक्यावर शोककळा पसरली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला, बागलाण, निफाड आदी तालुक्यात हजारो जवान देशसेवेसाठी कार्यरत असून गेल्या काही महिन्यात जिल्ह्यातील अनेक जवान देशसेवेवर कार्यरत असताना शहीद झाले आहेत.
छगन भुजबळ यांच्याकडून शोक व्यक्त
अजित यांच्या निधनानंतर छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले कि, येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुकचे सुपुत्र वीरजवान अजित शेळके हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात शहीद झाले. त्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. येवला तालुक्यातील ग्रामीण भागातून पुढे येऊन शिक्षण घेत सैन्यदलात भरती झालेले वीरजवान अजित शेळके यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय शहीद जवान शेळके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :