नाशिक महानगर पालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज तबला, शास्त्रीय गायन, सुगम संगीत, बासरी, कथ्थक, भरतनाट्यम व ड्रमने गोदाघाट संगीताच्या स्वरांनी फुलला होता.


Nashik: नाशिक शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवशीय अंतर्नाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी गायन-वादन- नृत्याचा अनोखा आविष्कार नागरिकांनी अनुभवला. शहरातील गोदागाठ पटांगणात हा भव्य कार्यक्रम साजरा होतो आहे. आज नाशिक शहरातील शास्त्रीय संगीतातील गायन, वादन आणि नृत्यक्षेत्रातील 1500 कलाकारांचा एकत्रित कलाविष्कार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी प्रमुख  पाहुण्या म्हणून प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगणा आणि गुरु डॉ. सुचिताताई भिडे - चापेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरवात सहभागी सर्व गुरुजनांच्या सामूहिक संपूर्ण वंदे मातरमने झाली. त्यानंतर कस्तुरी तिलकम हि कृष्ण वंदना सादर केली, मग सहभागी विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना हि गायन, बासरी, कथ्थक व भरतनाट्यम भावमुद्रेतून प्रस्तुत करण्यात आली. कार्यक्रमात पुढे राग दुर्गा सादर झाला. 


त्यानंतर कथ्थकच्या मुलींनी जय जगदीश्वरी माता सरस्वती हि नांदी प्रस्तुत केली व महागपतीम मनसा स्मरामी यावर भरतनाट्यम च्या मुलींनी सादरीकरण केले. पुढे यमन राग बासरी व तबल्याद्वारे सादर करण्यात आला. त्यानंतर राग तिलक कामोद - आलाप बंदिश, छोटा ख्याल - ताल त्रिताल हा प्रस्तुत करण्यात आला. कार्यक्रमात पुढे मालकंस राग आलाप व तानासहित मुलांनी सादर केला, देस राग, तराना - बंदिश गायन प्रस्तुत करण्यात आले. विद्यार्थ्यानी पुढे कथ्थक तबला जुगलबंदी सादर केले. मग कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ठुमक चलत रामचंद्र, मग वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम, त्यानंतर कानडा राजा पंढरीचा आणि शेवट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रचित जयोस्तुते या गीताने करण्यात आला. या अंतर्नाद कार्यक्रमात शहरातील तबला, शास्त्रीय गायन, सुगम संगीत, बासरी, कथ्थक, भरतनाट्यम व ड्रम यांचे अनेक दिग्गज व प्रतिष्ठित गुरुकुल यात सहभागी झाले होते. 


उद्या 25 हजार चौरस फुटाची रांगोळी


सोमवार 20 मार्च 2023 रोजी 'पर्यावरण रक्षण या अंतर्गत ‘पंचमहाभूते’ या विषयाला अनुसरून “महारांगोळी” 25 हजार स्वेअर फुट काढण्यात येणार आहे. नाशिक शहराच्या सर्व भागातून व स्तरातून 500 पेक्षा जास्त महिला एकत्र येऊन सुमारे 25 हजार चौरस फुट रांगोळी साकारतात. त्यासाठी त्याचे रांगोळीचे कौशल विकास प्रशिक्षण राबविले जाते. या सर्व कार्यक्रमांना नाशिककर नागरिकांनी मोठया प्रमाणात उउपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.