Nashik Leopard : नाशिकसह जिल्ह्यात बिबट्यांची दशहत असून रोजच कुठे ना कुठे हल्ल्याची घटना ऐकायला मिळत आहे. अशातच एक दुःखद घटना समोर आली असून दोन बिबट्यांचा (Leopard Death) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाढत्या उन्हामुळे (Climate Change) मृत्यू झाला असावा, असा अंदाज स्थानिक वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवाल बाकी असल्याने अद्याप मृत्यूचे कारण समोर आले नाही.
नाशिक (Nashik) शहर, जिल्हा आणि बिबट्या (Leopard) हे जणू समीकरणच बनले आहे. सद्यस्थितीत नाशिक पश्चिम वनविभागात (Nashik Forest) बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्याला पकडण्यासाठी आठ दिवसांपासून वनविभागाचे पथक तळ ठोकून आहे. त्र्यंबकेश्वर वनपट्ट्यात बिबट्याने अनेकदा हल्ले केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे बागलाण तालुक्यातील तांदुळवाडी येथे एकाच वेळी एकाच ठिकाणी मादी बिबट्या आणि तिच्या एक वर्षाच्या बछड्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हा विष प्रयोग नसून उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज मालेगावचे उपविभागीय वनाधिकारी जगदीश एडलावर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, बागलाण (Baglan) तालुक्यातही अनेकदा बिबट्याचा संचार होत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. बागलाण तालुक्यातील बराचसा भाग हा द्राक्ष बागायत, कांदा लागवडीखाली असल्याने काही ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र उन्ह वाढल्याने त्याचा परिणामही जाणवू लागला आहे. अशातच वाढत्या उन्हाचा फटका बिबट मादीसह बछड्याला बसला आहे. येथील तांदुळवाडी परिसरात गोप्या डोंगराच्या पायथ्याशी या बिबट्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे.
उन्हामुळे मृत्यू झाल्याचा संशय
दरम्यान, स्थानिक वनविभागाच्या मते उन्हामुळे दोन्ही बिबटायचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र शवविच्छेदनानंतर व्हीसेरा तपासणीसाठी पाठवला जाणार असून त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याचे समजते आहे. दरम्यान हा अहवाल सहा दिवसांत प्राप्त होण्याचा अंदाज ताहाराबाद वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी सहाणे यांनी वर्तवला आहे. या घटनेची ताहाराबाद वन विभागाकडून चौकशी सुरू आहे.
बिबट मृत्यूची दुसरी घटना
तांदूळवाडी शिवारातील गोप्या डोंगराच्या पायथ्याशी या बिबट्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस झाला. यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागास माहिती दिली. ताराबाद आणि वनपरिक्षेत्रातील अधिकारी शिवाजी सहाणे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृत बिबट्या आणि बछड्याला उत्तरी तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती म्हणून विभागाकडून देण्यात आले आहे. बागलांणमध्ये उन्हामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना आहे. दीड वर्षांपूर्वी बिबट्याचा येथे असाच मृत्यू झाला होता. ताहाराबाद वनपरिक्षेत्र अंबासन ते मुल्हेरक्षेत्रात दीडशेचे 200 च्या आसपास बिबटे असल्याची माहिती असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.