Nashik MVP Marathon नाशिक : 8 व्या राष्ट्रीय व 13 व्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेचा थरार उद्या रविवारी (दि.२८ जानेवारी) रंगणार आहे. यावेळी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व केलेले तसेच 'चक दे इंडिया' (Chak De India) चित्रपटाची प्रेरणा असणारे, आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू मीर रंजन नेगी (Mir Ranjan Negi) हे २०२४ मॅरेथॉन स्पर्धेचे आकर्षण असणार आहे.
यावेळी मॅरेथॉन स्पर्धेच्या (Nashik MVP Marathon) संयोजन समितीचे अध्यक्ष व मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, आरोग्यमंत्री भारती पवार, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, संचालक मंडळ, स्पर्धा निरीक्षक वैजनाथ काळे उपस्थित राहणार आहेत.
सकाळी पावणेसहाला मविप्र मॅरेथॉनला सुरुवात
रविवारी (दि. 28) सकाळी पावणेसहाला मविप्र मॅरेथॉन चौक येथून पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात होईल. यानंतर टप्याटप्याने विविध गटांच्या धावण्याच्या शर्यती पार पडतील. सकाळी अकराला रावसाहेब थोरात सभागृहात पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल.
असा असेल मॅरेथॉनचा मार्ग
मविप्र मॅरेथॉन चौक येथून सुरू स्पर्धेला सुरुवात होणार आहे. धोंडेगावपर्यंत जाऊन पुन्हा मॅरेथॉन चौक असा स्पर्धेचा मार्ग असेल. स्पर्धेसाठी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटीक्स मॅरेथॉन आणि रोड रेसेसच्या तांत्रिक नियमानुसार स्पर्धेचे अंतर कॅलीब्रेटेड बायसिकलचा वापर करून निश्चित करण्यात आले आहेत.
आठ रिफ्रेशमेंट पॉइंट
आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन नियमाप्रमाणे पूर्ण मॅरेथॉनसाठी आठ रिफ्रेशमेंट पॉइंट उभारले जाणार आहेत. या ठिकाणांवर इलेक्ट्रॉल पावडर, मिनरल वॉटर, लिंबू पाणी, ऑरेंज ज्यूस, मीठ पाणी अशा रिफ्रेशमेंटची व्यवस्था असेल.
सात स्पंजिंग पॉइंटची व्यवस्था
तसेच स्पंजिंग पॉइंटची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय पाच रुग्णवाहिका, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम व चाळी खाटांचे रुग्णालय आरोग्यसेवेसाठी तैनात असेल. फिजिओथेरपी महाविद्यालयातील डॉक्टरदेखील उपलब्ध असतील. सात लाख १६ हजारांचे एकूण पारितोषिके असणार आहेत.
असे असतील गट
खुल्या राष्ट्रीय पुरुष गटासाठी 42 किमीची पूर्ण मॅरेथॉन होईल. 21 किमीची अर्ध मॅरेथॉन असेल. महिलांसाठी दहा किमी अंतराची शर्यत असणार आहे. 27 वर्षाआतील मुले (5 किमी) व मुली (4 किमी), 19 वर्षाआतील मुले (10 किमी) व मुली (5 किमी), 25 वर्षाआतील मुले (12 किमी), मुली (6 किमी), 35 वर्षावरील महिला (5 किमी), ज्येष्ठ नागरिक पुरुषांसाठी (4 किमी) अंतराचा स्वतंत्र गट असणार आहे.
आणखी वाचा