Nashik Crime News नाशिक : शहरात चोरीच्या (Theft) गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. चोरी रोखणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान असल्याने नाशिक पोलीस आयुक्तांनी चोरांना पकडण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात अंबड पोलिसांना (Ambad Police) मोठे यश आले आहे. त्यांच्याकडून 1 लाख 35 हजार रुपये किमतीचे 7 मोबाईल फोन व एक मोटारसायकल (Two Wheeler) जप्त करण्यात आली आहे.


पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik), पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ मोनिका राउत (Monika Raut), सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख (Shekhar Deshmukh) यांनी जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर (Dilip Thakur) यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. 


चोरीचे मोबाईल आणले विक्रीसाठी


अंबड पोलीस ठाण्याचे (Ambad Police Station) गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस शिपाई शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम हे सोनवणे चाळ, गणेश चौक, सिडको, नाशिक या ठिकाणी एका लाल रंगाच्या टी.व्ही.एस. कंपनीच्या मोटारसायकलवर बसलेले असून त्यांच्याजवळ चोरीचे मोबाईल फोन आहे. त्यांनी ते विक्री करण्यासाठी आणलेले आहेत, अशी माहिती मिळाली. 


सापळा रचून दोन संशयित जेरबंद


त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख, पोलीस शिपाई शिंदे, गायकवाड, राऊत, जाधव, भोये, निकम, पाटील यांनी सापळा रचून योगेश शांताराम गायकवाड (19, रा. महालक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ, महाकाली चौक, सिडको) व अक्षयकुमार समाधान पगार (20, रा. महालक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ, महाकाली चौक, सिडको) यांना पकडले. या सराईतांची चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेले मोबाईल फोन असल्याची खात्री झाली. त्यांच्याकडून 1 लाख 35  हजार रुपये किमतीचे 7 मोबाईल फोन व एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. 


यांनी केली कामगिरी


ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त मोनिका राउत, परिमंडळ-०२ चे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक अजय नजन यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख यांच्या पथकाने केली आहे.


आणखी वाचा 


Rahul Gandhi : मोदी, ठाकरेंनंतर राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर; लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार