Nashik Mahayuti Melava नाशिक : २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला काँग्रेस सह इंडिया आघाडीच्या काही घटक पक्षांनी येण्यास नकार दिला आहे. ही इंडिया आघाडी नाही तर घमंडीया आघाडी असल्याची टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी केली. 


आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर महायुतीकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. आज राज्यभरातील सर्वच जिल्ह्यात महायुतीचे मेळावे (Mahayuti Meeting) आयोजित करण्यात आले आहेत. नाशिकमधील महायुतीच्या मेळाव्यात त्यांनी इंडिया आघाडीला डिवचलं.  


कांद्याला अनुदान देणारं पहिलचं सरकार


मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. भारती पवार म्हणाल्या की, सोशल मिडियावर कोणी लक्ष्य करत असेल तर त्यालाही आपण उत्तर द्यायला तयार असले पाहिजे. कांदा किंवा शेतकरी प्रश्नावर कोणी कमी पडलेले नाही. चिंता सगळ्यांनाच आहे. आम्ही वेळोवेळी प्रश्न मांडत असतो. पहिल्यांदाच कांद्याला अनुदान देणारे आपले सरकार आहे हे बोललेच पाहिजे.  कुठेतरी आपण हे मांडायला कमी पडतोय का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


मनात कटुता असेल तर इथेच मिटवा


सोशल मिडियावर आपण कमी पडतोय का? आपल्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांना आपण विरोधात उत्तर दिलेच पाहिजे. मनात कटुता असेल तर आज इथेच मिटवा, असेही भारती पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. नाशिक जिल्ह्याने विकासाच्या दिशेने नेहमीच पुढे पाऊल टाकले आहे. मात्र आता जबाबदारी मोठी आहे. आपण सगळ्यांनी मिळून काम करु, असेही त्या यावेळी म्हणाल्या.


दादा भुसेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल


काही लोक रोज सकाळी 8-9 ला उठले की, टिव्हीसमोर येणार वाकडी मान करणार, आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलणार, अरे तुम्हाला गल्लीत तरी कोणी विचारते का? कोणाचे रेशन कार्ड तरी काढून दिले का तुम्ही? अशा शब्दात कृषीमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भूसे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर (Dada Bhuse on Sanjay Raut) तोफ डागली आहे. 


नरहरी झिरवाळांची तुफान टोलेबाजी


माझ्याकडे अजित दादांचे घड्याळ आहे. आम्ही दहाचा कार्यक्रम असताना, दहा वाजून दहा मिनिटांनी आलो. अजित दादांचे घड्याळ कधीच मागे पुढे होत नाही, फडणवीस साहेबही वेळ पाळतात. शिंदे साहेबांचे होतं पण ते सॉरी म्हणतात, अशी तुफान टोलेबाजी त्यांनी करताच सर्वत्र मेळाव्याला एकच हशा पिकला. 


आणखी वाचा


Nashik Mahayuti Melava : नाशिकमधील महायुतीच्या मेळाव्याला छगन भुजबळांची दांडी; राजकीय चर्चांना उधाण