Nandgaon News नांदगाव : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या सुरु आहे. याच दरम्यान लेंडी नदीपात्रात नव्या पुलाचे काम सुरु असताना शहराला पाणीपुरवठा करणारी चारशे एमएमची मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे गेल्या २० दिवसांपासून नांदगावसह सतरा गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तब्बल २० दिवस उलटूनही नगरपरिषदेमार्फत केला जाणारा पाणीपुरवठा करण्यात न आल्याने नांदगाव येथील कैलासनगरच्या महिलांनी रस्त्यावर येत रास्ता-रोको आंदोलन केले. हातात रिकामे हांडे घेवून ते वाजवत नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराविरूध्द जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी वणवण
शहरासह सतरा गावांचा खंडित झालेला पाणीपुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर होणारे काम रेंगाळत चालले आहे. सलग वीस दिवस उलटूनदेखील पाण्याचे वितरण होऊ न शकल्याने नांदगावला ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे.
सतरा गावांचा पाणीपुरवठा ठप्प
सध्या नांदगाव (nandgoan) शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु असतानाच लेंडी नदीपात्रात नव्या पुलाचे काम सुरु करण्यात आले. या दरम्यान शहराला पाणीपुरवठा करणारी चारशे एमएमची मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे नांदगावसह सतरा गावाचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.
दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहेगाव धरणाने तळ गाठले आहे. सध्या माणिकपुंज धरणातून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मात्र प्रामुख्याने मदार असलेल्या गिरणा धरणावरील (Girna Dam) ५६ खेडी नळयोजनेची मुख्य जलवाहिनीदेखील फुटली. परिणामी पाणी पुरवठा ठप्प झाला. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
नगरपरिषदेच्या आश्वासनानंतर रास्ता-रोको मागे
20 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त महिलांनी रिकामे हांडे वाजवत रास्ता-रोको आंदोलन केले. गिरणा धरणातून होणारा पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने पाणी सोडण्यास विलंब झाल्याचे कारण देत सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन नगरपरिषदेने दिले. यानंतर रास्ता-रोको आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यावेळी नांदगाव-संभाजीनगर रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
इतर महत्वाच्या बातम्या