Nashik Mahayuti Melava नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर महायुतीकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. आज राज्यभरातील सर्वच जिल्ह्यात महायुतीचे मेळावे (Mahayuti Meeting) आयोजित करण्यात आले आहेत.  राज्यातील 25 मंत्र्यांसह 52 प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाशिकच्या महायुतीच्या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ अनुपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. 


23 जानेवारीला ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. त्याच ठिकाणी महायुतीची समन्वय बैठक आयोजित कण्यात आली आहे. बैठकीला शिवसेनेकडून मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, भाजपकडून आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले तसेच अजित पवार गटाकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार सरोज आहिरे, आमदार दिलीप बनकर,आमदार नितीन पवार उपस्थित आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत. 


भुजबळांनी फिरवली मेळाव्याकडे पाठ


नाशिकमध्ये होणाऱ्या मेळाव्याला छगन भुजबळ अनुपस्थित आहेत. या मेळाव्याला छगन भुजबळांनी नाशिक जिल्ह्यात असून देखील पाठ फिरवल्याचे दिसून येते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  


कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलनाचा प्रयत्न


गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या राजकीय घडामोडी आणि आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपसह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करून त्यांच्यात मनोमिलन व्हावे, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा आहे. आम्ही सर्व एकत्र असल्याचे दाखवत विरोधकांना आपली ताकद दाखवण्याचादेखील या माध्यमातून प्रयत्न केला जाणार असल्याचे समजते.


काय म्हणाले सुहास कांदे? 


निवडणुकीत मान सन्मान बाजूला ठेवायला हवे. मोदी साहेबांनी खूप घोषणा केल्या, आपल्या राज्य सरकारनेही केल्या. त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. माझे वयक्तिक मत आहे की, लोकसभा झाली मोदी पुन्हा पीएम झाले की जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका लगेच लागतील. कोणालाही उमेदवार दिला तरी आम्ही त्याला निवडून देऊ असा विश्वास आपण शिंदे, फडणवीस, अजित दादांना देत असल्याचे आमदार सुहास कांदे म्हणाले.


राज्यात कोणत्या नेत्यावर कुठली जबाबदारी


नागपूर : चित्रा वाघ (भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा), जयदीप कवाडे (रिपब्लिकन पक्ष कवाडे गट)
छत्रपती संभाजीनगर : संदिपान भुमरे (कॅबिनेटमंत्री)
गडचिरोली : सुबोध मोहिते (माजी केंद्रीयमंत्री)
अहमदनगर : राधाकृष्ण विखे-पाटील (कॅबिनेटमंत्री)
अकोला : प्रवीण दरेकर (गटनेते भाजप, विधान परिषद)
सोलापूर : चंद्रकांत पाटील (कॅबिनेटमंत्री)
अमरावती : बच्चू कडू (माजी मंत्री), अनिल बोंडे (खासदार), रवी राणा (आमदार)
पुणे : रामराजे नाईक-निंबाळकर (माजी सभापती, विधान परिषद), आमदार प्रसाद लाड (समन्वयक महायुती)
भंडारा : विजयकुमार गावित (कॅबिनेटमंत्री)
धुळे : गिरीश महाजन (कॅबिनेटमंत्री)
लातूर : संभाजी निलंगेकर-पाटील (माजी मंत्री)
धाराशिव : तानाजी सावंत (कॅबिनेटमंत्री)
परभणी : संजय बनसोडे (कॅबिनेटमंत्री)
पालघर : रवींद्र चव्हाण (कॅबिनेटमंत्री), हितेंद्र ठाकूर (अध्यक्ष- बहुजन विकास आघाडी)
सिंधुदुर्ग : आदिती तटकरे (कॅबिनेटमंत्री)
हिंगोली : अब्दुल सत्तार (कॅबिनेटमंत्री)
मुंबई : दीपक केसरकर (कॅबिनेटमंत्री), आशिष शेलार (अध्यक्ष, मुंबई भाजप), राहुल शेवाळे (खासदार, शिंदे गट), अविनाश महातेकर (माजी मंत्री,
रिपाइं आठवले गट), सचिन खरात (रिपाइं खरात गट), सिद्धार्थ कासारे (रिपाइं आठवले गट)
कोल्हापूर : हसन मुश्रीफ (कॅबिनेटमंत्री)
बीड : धनंजय मुंडे (कॅबिनेटमंत्री), तानाजीराव शिंदे (शिवसंग्राम)
सातारा : शंभूराज देसाई (कॅबिनेटमंत्री)
ठाणे : श्रीकांत शिंदे (खासदार)
मुंबई उपनगर : आशिष शेलार (अध्यक्ष, मुंबई भाजप), छगन भुजबळ (कॅबिनेटमंत्री), गजानन कीर्तीकर (खासदार), रामदास कदम (माजी मंत्री)
गोंदिया : धर्मरावबाबा अत्राम (कॅबिनेटमंत्री)
नंदुरबार : अनिल भाईदास पाटील (कॅबिनेटमंत्री)
वर्धा : दीपक सावंत (माजी मंत्री)
चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार (कॅबिनेटमंत्री)
जालना : अतुल सावे (कॅबिनेटमंत्री)


आणखी वाचा 


Makar Sankranti 2024 : येवल्यात आजपासून तीन दिवस पतंगोत्सव, राज्यभरातून पतंगप्रेमी दाखल, छगन भुजबळांनीही लुटला आनंद