Nashik Mahayuti Melava नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर महायुतीकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. आज राज्यभरातील सर्वच जिल्ह्यात महायुतीचे मेळावे (Mahayuti Meeting) आयोजित करण्यात आले आहेत.  राज्यातील 25 मंत्र्यांसह 52 प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाशिकच्या महायुतीच्या मेळाव्याला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेत तुफान टोलेबाजी केली. 


23 जानेवारीला ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. त्याच ठिकाणी महायुतीची समन्वय बैठक आयोजित कण्यात आली आहे. बैठकीला शिवसेनेकडून मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, भाजपकडून आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले तसेच अजित पवार गटाकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार सरोज आहिरे, आमदार दिलीप बनकर,आमदार नितीन पवार उपस्थित आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत. 


कायमस्वरूपी एकत्र राहण्याची शपथ


विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की, मला शेवटी बोलायला आवडत नाही. कारण सगळे कंटाळलेले असतात. आजच्या बैठकीला जागा निवडली, ते नाव मला येत नव्हतं. आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची आहे. मोदी साहेबांचा आध्यात्मावर विश्वास आहे. उद्या मकर संक्रांत आहे, आपल्याला आता गोड बोलायचं आहे. आपण तिळगुळ देऊन जे गोड तोंड करू, ते कायमस्वरूपी एकत्र राहण्याची शपथ घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.


अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंचे नाव घेत तुफान टोलेबाजी  


माझ्याकडे अजित दादांचे घड्याळ आहे. आम्ही दहाचा कार्यक्रम असताना, दहा वाजून दहा मिनिटांनी आलो. अजित दादांचे घड्याळ कधीच मागे पुढे होत नाही, फडणवीस साहेबही वेळ पाळतात. शिंदे साहेबांचे होतं पण ते सॉरी म्हणतात, अशी तुफान टोलेबाजी त्यांनी करताच सर्वत्र मेळाव्याला एकच हशा पिकला. 


आता फक्त लोकसभा आणि लोकसभाच


४५ खासदार का? ४८ पैकीच्या पैकी का नको? उरलेले तीन धाकधूक होतील. आपण सर्व खासदार निवडून आणले पाहिजे. आता कधी नव्हे, एवढे पैसे प्रत्येकाला मिळाले आहेत. कर्जही घेऊ नका आणि विकास करा, असे कसे होईल? आता फक्त लोकसभा आणि लोकसभाच,  असे त्यांनी म्हटले. तसेच बॅनरवर माझा पण फोटो असावा, असे प्रत्येकाला वाटते, असे झिरवाळ बोलल्यावर मंचावरील सर्व उपस्थित बॅनरकडे बघायला लागले होते.


भुजबळांनी फिरवली मेळाव्याकडे पाठ


नाशिकमध्ये होणाऱ्या मेळाव्याला  छगन भुजबळ अनुपस्थित आहेत. या मेळाव्याला छगन भुजबळांनी नाशिक जिल्ह्यात असून देखील पाठ फिरवल्याचे दिसून येते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  


आणखी वाचा


Nandgaon News : नांदगावात 20 दिवस उलटूनही पाणीपुरवठा नाही; महिलांचा रास्ता रोको, नगरपरिषदेच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे