Dada Bhuse नाशिक : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारी करत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघावर (Nashik Lok Sabha Constituency) याआधी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. आता नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी नाशिक लोकसभेची जागा ही शिवसेनेचीच आहे, असा दावा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दादा भुसे म्हणाले की, नाशिकची विद्यमान जागा ही शिवसेनेकडे (Shiv Sena) आहे. त्यामुळे नाशिकवर शिवसेनेचाच दावा कायम आहे असे त्यांनी म्हटले आहे. तसेच या संदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. शिवसेनेचा विषय आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेब निर्णय घेतील, असेही त्यांनी म्हटले आहे. दादा भूसेंच्या डाव्यानंतर आता भाजप आणि अजित पवार गट काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
श्रीकांत शिंदेंना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हे माहित नव्हतं
श्रीकांत शिंदे यांनी वडील मुख्यमंत्री होतील असे माहीत नसल्याचे वक्तव्य केले. याबाबत दादा भुसे म्हणाले की, ही वस्तुस्थिती आहे. श्रीकांत शिंदे साहेबांना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील हे बिलकुल माहित नव्हतं. त्या गोष्टींचा साक्षीदार मी स्वतः आहे. नुसतं मुख्यमंत्रीच नाही या घडामोडी होतील हे सुद्धा त्यांना माहीत नव्हते. मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भातला निर्णय ज्यावेळी घोषित झाला त्या वेळेला मी आणि तेच बसलेलो होतो. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत होतो. अचानकपणे ती बातमी फ्लॅश झाली मलाही माहित नव्हते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असे दादा भुसे म्हणाले.
लोकशाहीमध्ये या गोष्टी अभिप्रेत
आपापल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या आणि गाव तसेच शहरातील छोटे पक्ष संपवा, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. यावर दादा भुसे म्हणाले की, वापरून घेतो असं काही नाही. प्रत्येक पक्ष छोटा असू दे, मोठा असू दे, आपला पक्ष वाढला पाहिजे या अनुषंगाने प्रयत्न करत असतो. लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टी अभिप्रेत आहेत, असे ते म्हणाले.
काहीजण फक्त तुतारी वाजवायची ॲक्शन करत होते
शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावर दादा भुसे म्हणाले की, तुतारीला मी हार्दिक शुभेच्छा देतो. काहीजण फक्त तुतारी वाजवायची ॲक्शन करत होते. रेकॉर्डिंग केलेला तुतारीचा आवाज स्पॉन्सर केला जात होता, असा टोला त्यांनी लगावला आहे.
आणखी वाचा