नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला तालुक्यात प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून (Youth Murder) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आमच्या मुलीकडे वाईट नजरेने बघतो म्हणत संबंधित संशयितांना जबर मारहाण केली. त्यानंतर उपचार सुरु असताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील मुखेड गावात ही घटना घडली असून यात प्रतीक आहेर (Pratik Aher) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट रोजी प्रतीक आणि तुषार हे दोघे साई अॅग्रो नावाच्या दुकानात बसले असताना त्यांना गावातील निखिल जाधव यांचा फोन आला आणि भेटण्यासाठी बोलावले. त्याचवेळी तुषार हा देखील आठवडी बाजार असल्याने भाजी आणण्यासाठी बाजारात निघून गेला. काही वेळानंतर तुषार हा पुन्हा साई अॅग्रो दुकानात आल्यानंतर बराच वेळ झाला अद्यापही प्रतीक आला नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे तुषार आणि फिर्यादी यांनी प्रतीकचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तो कुठे आढळून आला नाही. त्याला संपर्क देखील करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो फोन उचलत नव्हता तर काही वेळाने फोन देखील बंद झाला
दरम्यान, शोध घेत असताना प्रतीकची दुचाकी आणि निखिलची दुचाकी एका शेताजवळ लावलेली दिसून आली. याबाबत निखिलच्या वडिलांना कॉल केला असता त्यांनी ते दोघे येवल्याला (Yeola) गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आम्ही शहानिशा करण्यासाठी येवला शहर गाठून शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी देखील प्रतीक आढळून आला नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा गावाकडे येत जाधव यांच्या शेताजवळ गेलो असता प्रतीक जखमी अवस्थेत दिसून आला. याबाबत प्रतिकला विचारपूस केली असता गावातीलच कुटुंबातील लोकांनी मारहाण केल्याचे सांगितले. तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिकला अशोका हॉस्पिटल ला दाखल केले मात्र उपचार सुरू असताना प्रतीकचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी येवला पोलिसांनी चार संशयतांना ताब्यात घेत कोणाचा गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
प्रतीक याचे गावातीलच एका तरुणी बरोबर प्रेम असल्याचे सांगितले जात आहे. याचा राग तिच्या कुटुंबियांना होता. यातूनच प्रतीकला निर्जन स्थळी बोलवून त्याला जबर मारहाण करण्यात आली. आमच्या मुलीपासून दूर राहा, आमच्या नादाला लागू नको, असे म्हणत मारहाण करत जखमी अवस्थेत सोडले. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर उशिराने प्रतीक मिळून आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी येवला तालुका पोलिसांनी वसंत केशव जाधव, संदीप वसंत जाधव, सुनील वसंत जाधव आणि निखिल संदीप जाधव या संशयिताना ताब्यात घेतले आहे. याबाबत येवला पोलीस स्टेशनचे पोलीस उप अधीक्षक विशाल क्षीरसागर अधिक तपास करत आहेत.