Maharashtra Onion Issue : कांदा प्रश्नावर (Onion Issue) महत्वाची बातमी समोर आली असून कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Mudne) आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्या झालेल्या बैठकीत कांदा दराबाबत महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकार नाफेडमार्फत (NAFED) दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. त्यामुळे काहीअंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 


केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढविल्यामुळे (Export Duty) गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे अनेक आंदोलन करण्यात आली. रास्ता रोको करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेत कांदा प्रश्नावर चर्चा केली. यावर पियुष गोयल यांनी सकारात्मक उत्तर देत कांदा प्रश्नावर दिलासा देणारी घोषणा केली आहे. त्यानुसार केंद्र सरकार नाफेडमार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रतिक्विंटल भावाने खरेदी करणार असल्याची घोषणा मंत्री पियुष गोयल यांनि केली आहे. 


दरम्यान केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा (onion) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिली. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल, असेही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमितशाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी फडणवीस यांनी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली.  


कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि वाणिज्य मंत्री यांची चर्चा सुरु असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जपानमधून केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पियुष गोयल यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. काही वेळापूर्वीच कांदा प्रश्नी तोडगा काढल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट करत त्यांनी जाहीर केलं.  त्यामुळे एकीकडे धनंजय मुंडे चर्चा करत असताना त्या सुमारास फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कांदा प्रश्नावर तोडगा निघाल्याचे जाहीर केले. अशातच धनंजय मुंडे कृषिमंत्री झाल्यानंतर कांदा प्रश्न ही एक मोठी परीक्षाच होती, यात मुंडे पास होणार का अशाही चर्चा रंगू लागल्या होत्या. भेटीसाठी दिल्लीला गेल्यानंतर पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार लागलीच नाफेडमार्फत २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केली जाणार असल्याची माहिती गोयल यांनी दिली. त्यामुळे मुंडे यांना देखील दिलासा मिळाला आहे. खरेदीसाठी नाशिक आणि अहमदनगरला खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून ही फक्त घोषणा ठरू नये, असंही बोलले जात आहे. 


फडणवीस यांचे ट्विट 


कांदा प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली. ते लिहितात की, 'महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.  2410 रुपये प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल.



इतर महत्वाची बातमी : 


Onion News : केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र; उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती