नाशिक : पुढील दोन दिवसांत नाशिक आणि अहमदनगरच्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडी धरणात सोडू नये, अशी मागणी करत नांदूर मध्यमेश्वर धरणाजवळ आंदोलन करण्यात आले आहे. निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. त्याचबरोबर जायकवाडी धरणात पाणी सोडू नये, यासाठी लेखी निवेदन अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग नाशिक यांना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे आगामी काळात मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. 


दरवर्षीं नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यात येते. हे पाणी आरक्षित करण्यात येत असून मराठवाड्यासाठी जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून 31 ऑक्टोबरपूर्वी पाणी सोडणे बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून आज किंवा उद्या हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच, 8 ते 9 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता असल्याची देखील माहिती मिळत आहे. मात्र, दुसरीकडे नाशिकमधील काही तालुक्यातील शेतकऱ्यांनी यास विरोध दर्शवत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. निफाड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडी धरणात सोडू नये, या मागणीसाठी अमृता पवार यांच्या नेतत्वाखालील आंदोलन केले आहे. 


यंदा नाशिक जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर निफाड व येवला तालुक्यातील नागरिकांना अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे,  निफाड व येवला तालुक्याचे हक्काचे पालखेड धरणाचे पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणामार्गे जायकवाडी धरणात सोडण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शासनाने आमचे म्हणणे ऐकून घेत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे आता शासन याबाबत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्यात यावे यासाठी काही संघटनांनी आंदोलन देखील केल्याचे समोर येत आहे. दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी मागणी लावून धरल्याने पाणी आवर्तनावर काय निर्णय होतो हे पाहावे लागणार आहे. 


विविध धरणातून पाणी सोडण्याचा प्रस्ताव.... 


प्राथमिक माहितीनुसार, मराठवाड्यासाठी किती पाणी सोडावे, यावरून जलसंपदा विभागाच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या वरिष्ठ अभियंत्यांच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत असल्याने निर्णय घेण्यासाठी उशीर होत आहे. नाशिक आणि अहमदनगरच्या धरणातून पाणी सोडल्यावर हे पाणी जायकवाडी धरणात येईपर्यंत अंदाजे 30 टक्के पाण्याचा नुकसान होते. त्यामुळे, जायकवाडी धरणात साडेनऊ टीएमसी पाणी यावे, आणि यासाठी साडेबारा टीएमसी पाणी वरील विविध धरणातून सोडण्याचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरच्या अभियंत्यांनी दिला आहे. मात्र, जायकवाडीत साडेसात टीएमसी पाणी पोहोचावे, यासाठी 11 टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्याचे प्रस्ताव नाशिक विभागातील अभियंत्यांचा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बैठकीत 8 ते 9 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


मराठवाड्यासाठी मोठी बातमी! वरील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा दोन दिवसांत निर्णय होणार?