Nashik : नाशिकमध्ये महिनाभरात 40 हजार नागरिकांनी आयुष्यमान भारतची नोंदणी केली आहे. तर हजाराहून अधिक जणांवर उपचार करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत 1209 आजारावरील उपचार व शस्त्रक्रिया या योजनेमार्फत मोफत केल्या जातात. सन 2011 च्या सामाजिक आर्थिक व जातीय सर्वेक्षणातून नाशिक जिल्ह्यातील लाभार्थ्यांची आयुष्यमान भारत योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेसाठी 16 लाख 07 हजार 144  लाभार्थी पात्र ठरले आहेत. 23 सप्टेंबर 2018 पासून आज पर्यंत सरासरी  05 लाख 30 हजार लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारतचे इ कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढलेले आहे. 


कोविड मुळे दोन वर्ष या योजनेत लाभार्थींचा सहभाग कमी होता, तो वाढावा या हेतूने जिल्हाधिकारी गंगाथरन डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर यांच्या मार्गदर्शनानुसार उर्वरित सरासरी 11 लाख व्यक्तींचे गोल्डन कार्ड काढणे बाकी आहे, यासाठी विशेष मोहीम राबविणे सुरू केले आहे. आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी नामनिर्देशन केलेल्या 10 लाभार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी लाभार्थ्यांना या कार्डचे महत्व सांगत योजनेतील समाविष्ट दवाखान्यात उपचार घ्यावे असे आवाहन केले


त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील आपले सरकार केंद्र व ग्रामपंचायत कार्यालय येथे हे कार्ड यापुढेही काढून मिळणार आहे यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग तसेच जिल्हा रुग्णालय यांच्यातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत असून गोल्डन कार्ड काढण्यासाठी मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. यामध्ये लाभार्थींनी आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा ग्रामपंचायत केंद्रात जाऊन मोफत स्वरूपात इ कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढून घ्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी केले आहे. 


अशी आहे प्रक्रिया 
आयुष्यमान भारत इ कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्याकडे असलेले आयुष्यमान भारत चे पत्र, रेशन कार्ड किंवा आधार कार्ड ही कागदपत्र घेऊन जवळच्या ग्रामपंचायत मध्ये किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जावे स्वतःचा मोबाईल क्रमांक जवळ ठेवावा. त्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक हा नोंदणी करणाऱ्या व्यक्तीस द्यावा म्हणजेच इ कार्ड त्वरित तयार होऊन आपल्याला उपलब्ध होईल. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही।


कुठे वापरले जाते आयुष्यमान भारत ई कार्ड
कोणत्याही ग्रामपंचायत किंवा आपले सरकार सेवा केंद्राकडून जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना विविध आजारावर उपचार व शस्त्रक्रियांसाठी जिल्ह्यातील 63 सरकारी व खाजगी हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला असून आयुष्यमान भारतचे इ कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढल्यास विविध 1209 प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रियाचा यात समावेश आहे. आयुष्यमान भारत पात्र लाभार्थ्यांना 05 लक्ष रुपये पर्यंत वैद्यकीय संरक्षण मिळते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996 आजारांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी  01 लाख 50 हजार रुपये पर्यंतचे वैद्यकीय संरक्षण मिळते. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी दोन लक्ष 50 हजार रुपयांची तरतूद केली असून ज्या लाभार्थींनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढलेले नाही त्यांनी आपल्या घरा जवळच्या आपले सरकार किंवा ग्रामपंचायत कार्यालय येथे जाऊन हे कार्ड काढून घ्यावे.