नाशिक : नाशिकच्या (Nashik) येवल्यातून (Yeola) धक्कादायक घटना समोर आली असून कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा नदीपात्रातील बंधाऱ्यात बुडून (drowned) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथील नारंगी नदीवर कपडे धुण्यासाठी हे कुटुंब गेलं होत. मात्र पाय घसरून लहान भाऊ पडल्यानंतर मोठ्या भावाने त्याला वाचविण्यासाठी उडी घेतली, मात्र यात दोघांचाही करुण अंत झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
अलीकडे धरणात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. कधी पाय घसरून तर कधी पोहण्याच्या नादात खोलीचा अंदाज ना आल्याने बुडून मृत्यू होत आहेत. काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील (Nashik District) तरुणांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशातच येवला तालुक्यात असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. याचवेळी आईने देखील दोघांना वाचविण्याच्या नादात धरणात (dam) उडी घेतली होती. मात्र सुदैवाने काही शेतकऱ्यांनी तात्काळ धाव घेत तिचे प्राण वाचविले. मात्र दोन भावांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.
येवला तालुक्यातील उंदिरवाडी येथे भाऊसाहेब जाधव कुटुंबासह राहतात. या गावाजवळून नारंगी नदी असून बाजूलाच एक बंधारा देखील आहे. सद्यस्थिती नारंगी नदीतून पाणी सोडण्यात आल्याने बंधाराही भरलेला आहे. जाधव यांच्या पत्नी अनिता घरातील कामे आटोपल्यावर मुलगा गौरव व स्वप्नील या दोन्ही मुलांना घेऊन कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुवत असताना अचानक लहान मुलगा गौरव पाय घसरून पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी मोठा भाऊ स्वप्निलने उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने ते दोघेही बुडाले. हे पाहून आईने देखील पाण्यामध्ये उडी घेतली, मात्र त्यांनाही पोहता येत नव्हते. हे दृश्य रस्त्यावरून जाणाऱ्या काही शेतकऱ्यांनी पाहिले. त्यांनी आईलावर काढले. मात्र दोन भावंडांचा बुडून मृत्यू झाला.
आईनंही उडी मारली, पण...
दरम्यान पोरांना बुडताना पाहून आईनेही उडी घेतली. मात्र आईलाही पोहता येत नसल्याने आईही पाण्यात बुडू लागली. हा प्रकार आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाहिल्यावर उडी मारून त्यांनी आईला वाचविले. मात्र मुले बंधाऱ्यातील चिखलात अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही भावंडांवर सायंकाळी उंदीरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वप्निल येवला महाविद्यालयात बीकॉमच्या तिसऱ्या वर्षाला होता. त्याची प्रात्यक्षिक परीक्षा होती. मात्र तो आलाच नाही. गौरव एंझोकेम विद्यालयात अकरावी शास्त्र शाखेला होता. सहामाही परीक्षेचा मराठीचा पेपर सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत देऊन तो घरी गेला होता. या घटनेमुळे येवला तालुका हळहळला असून जाधव कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.