नाशिक : मराठा आंदोलनाची (Maratha Andolan) धग नाशिकमध्ये (Nashik) देखील वाढलेली असून आज सकाळपासून ठीकठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलन आणि मूक मोर्चे0 काढले जात आहेत. आता तर मराठा आंदोलकांनी थेट भाजप आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांच्या संपर्क कार्यालयावर हल्लाबोल केला आहे. आमदार सीमा हिरे यांचे सिडको येथील कार्यालयाला आंदोलकांकडून टाळे ठोकण्यात आले आहे. त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजीसह राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. 


मराठा आरक्षण (Maratha Arakshan) मागणीवरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून आंदोलनाला (Protest) हिंसक वळण लागल्याचे अनेक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. हळूहळू हे लोण नाशिक जिल्ह्यात येऊ लागल्याचे दिसून येत आहे. आज सकाळीच मराठा बांधवांकडून शांततेच्या मार्गाने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तर कालच खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना घेराव घालत राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला. मात्र आज मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून शहरातील भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या सिडको विभागातील कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. त्याचबरोबर उपस्थित आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. तसेच भाजपा आमदार सीमा हिरे यांनी राजीनामा द्यावा, अशा पद्धतीची मागणी या आंदोलकांकडून करण्यात आली. 


'एक मराठा लाख मराठा'चा जयघोष करीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच आरक्षणासाठी झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना पांठिबा मिळावा, यासाठी सकल मराठा समाज सिडको विभागाच्या वतीने सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून आज मराठा समाजाच्या वतीने भाजपा आमदार सीमा हिरे यांनी राजीनामा द्यावा यासाठी त्यांचे सिडको भागातील कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन केले.यावेळी आंदोलन करताना एक मराठा लाख मराठा असे म्हणत आमदार सीमाताई  हिरे राजीनामा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. 'एकीकडे केंद्र सरकारमध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यातही सत्ता आहे. मग आरक्षण देण्यात अडचण काय? याचा अर्थ जाणूनबुजून आरक्षण देण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे. भाजपचे आमदार नंतर आधी हे मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणून यांनी भूमिका मांडणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नसल्याचे आम्हाला अशी पाऊले उचलावी लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. 


मराठा आंदोलनाची धग आता पुण्यापर्यंत


मराठा आंदोलनाची धग आता पुण्यापर्यंत येऊन पोहचली आहे. आंदोलकांनी (Maratha Reservation Protest) पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ रस्ता अडवला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाच ते सात किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहे. महत्वाचं म्हणजे यात रुग्णवाहिका आणि स्कूलबसेसदेखील अडकल्या आहे. मागील दोन तासांपासून विद्यार्थी आणि रुग्ण तातकळत आहे. शिवाय अनेक नागरिकदेखील वाहतूक कोंडीत अडकले आहेत. 



इतर महत्वाची बातमी : 


Maratha Reservation Protest LIVE : इंदापूरमध्ये मराठा आंदोलकांचे अनोखे आंदोलन, जरांगे पाटलांच्या उपोषणाला दिला पाठिंबा