नाशिक : 'कधी एकदम चांगला भाव मिळतो तर कधी एकदम रस्त्यावर फेकण्याची वेळ येते. मात्र काही वेळा डिमांड आणि सप्लाय या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. पाऊस काळ कसा आहे, यावर भाव अवलंबून असतात. अशा पद्धतीने कांदे टोमॅटो (Tomato) रस्त्यावर फेकून प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांनी सबुरीने भूमिका घेणं आवश्यक आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. 


आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नाशिक (Nashik) दौऱ्यावर असताना कळवण येथे शेतकरी कृतज्ञता मेळाव्यात बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले, कांदा निर्यात शुल्कावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. हे निर्यात शुल्क काढून टाकले पाहिजे, याबाबत सबुरीने भूमिका घेणं आवश्यक आहे, अशी सर्वांची भावना आहे, कारण शेतकऱ्यांना त्यामुळेच दोन पैसे अधिकचे मिळतात. एखाद्या पिकाला चांगला भाव मिळाला की सर्व शेतकरी त्याच पिकाची लागवड करतात. परिणामी पिकाचा पुरवठा वाढला की भाव घसरतात. शेतमाल रस्त्यावर फेकल्याने घसरलेले भाव वाढणार नाहीत, हे जे काही ग्राहक आणि उत्पादक याचा जो ताळमेळ साधला गेला पाहिजे. तसेच सरकार तुमच्यासोबत आहे, शेतक-यांना आम्ही वा- यावर सोडणार नाही असे आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिले. 


सध्या टोमॅटोचे (Tomato Rate Down) भाव कोसळले आहेत, दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला सर्वाधिक भाव होता. मध्यंतरी कांद्याचा प्रश्न मोठा बिकट झाला होता. व्यापाऱ्यांनी कांदा घेणे बंद केलं होतं. कधी एकदम चांगला भाव मिळतो तर कधी एकदम रस्त्यावर फेकण्याची वेळ येते. मात्र काही वेळा डिमांड आणि सप्लाय या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. पाऊस काळ कसा आहे, यावर भाव अवलंबून असतात. धरणात किती पाणी आहे? नैसर्गिक संकट काही आले का? असे प्रश्न समोर येत असतात. त्यावर मार्ग काढणे आवश्यक आहे. या सगळ्यांवर भाव अवलंबून असतात. त्यामुळे अशा पद्धतीने कांदे टोमॅटो रस्त्यावर फेकून प्रश्न सुटणार नाही. त्याच्यात काही प्रक्रिया करणारी गोष्टी करता येतील का? दुसरा काही मार्ग काढता येईल? यावर चर्चा केली पाहिजे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना कदापी वाऱ्यावर सोडणार नाही, जे जे राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या निर्णय घ्यावे लागतील, तेथे निर्णय एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व मिळून घेऊ आणि जिथं केंद्रामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्याकडे देखील पाठपुरावा करू, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत आम्ही पाठपुरावा करण्यात कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास यावेळी अजित पवार यांनी दिला. 


आरक्षणाला धक्का लावू देणार नाही... 


गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात आरक्षणावरून लोकांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र राज्यात ज्यांना ज्यांना आरक्षण दिलेले आहे, या कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. काही जण वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे काढतात, वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येतात, पण मी आज जबाबदारीनं तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुमच्या आरक्षणाला कोणताही धक्का हे महायुतीचं सरकार लावू देणार नाही. तुमचा अधिकार तुम्हालाच राहील, हे ध्यानात ठेवा. जर ॲडिशनल द्यायचं झालं तर मात्र तो विचार केला जाऊ शकतो, मागे तसा प्रकारचा विचार झाला होता. दुर्दैवाने हायकोर्टात टिकला नाही. त्यानंतर एकदा सुप्रीम कोर्टात टिकला नाही. वेगवेगळे समाज आरक्षण मागतात, संविधानाने तो अधिकार त्यांना दिलेला आहे. घटनेने प्रत्येकाला आपली मागणी मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु ती मागणी ती कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसवण्याचं काम हे राज्यकर्त्यांना करावं लागतं, उगीच उठलो आणि हा दिलं सगळ्यांना आरक्षण असं म्हणून चालत नाही, ती वेळ मारून देण्यासारखं होतं, त्यामुळे याबाबत आपण सगळ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा अशा प्रकारची विनंती अजित पवार यांनी यावेळी केली. 


सप्तशृंगी देवीकडे काय मागितलं? 


दरम्यन आज सकाळी अजितदादांनी गडावर जात सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं. यावर ते म्हणाले की, 'सगळीकडे एक सुख शांती समृद्धी नांदावी गणेशोत्सव चांगला पार पडलेला आहे नवरात्र दसरा चांगल्या पद्धतीने पार पडावा. येणारी दिवाळी दसरा चांगल्या पद्धतीने व्हावा आणि राहिलेल्या दिवसात पाऊस पडून धरण जर भरली तर माझ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक आनंद पाहायला मिळेल. तशा पद्धतीचा माझ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळावा, हीच मी देवीला प्रार्थना केली. देवीला साकडं घातल, त्याच्यापेक्षा काही दुसरं मागणं केलं नाही, असं अजित पवार म्हणाले. 


इतर महत्वाची बातमी : 


Ajit Pawar : सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला लवकरच मंजुरी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाशिकमध्ये मोठी घोषणा