नाशिक : नाशिकच्या दिलीप महादू गावित याने पॅरा एशियन गेम्समध्ये अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारात टी 47 श्रेणीतील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे दिलीप आगामी 2024 च्या पॅरा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला असून त्याच्या या कामगिरीचे कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.


चीनमधील हांगझू येथे सुरू असलेल्या एशिनय पॅरा गेम्समध्ये भारतीय पॅरा अॅथलिट्सनी इतिहास रचला. भारताने आपली मोहीम 111पदकांसह यशस्वीरित्या फत्ते केली. भारताने एखाद्या मोठ्या स्पर्धेत केलेली ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. भारताने 29 सुवर्ण पदके, 31 रौप्य तर 51 कांस्य पदके पटकावली. यात नाशिक जिल्ह्यातील दिलीप गावीत या तरूणानेही सुवर्णपदक जिंकले आहे. दिलीपने पॅरा ऑलिम्पिक या क्रीडा प्रकारात 400 मीटरमध्ये भारताला कोटा मिळवून देत क्वालिफाय केले. त्याला क्रीडा प्रशिक्षक आनंद काळे यांचे मार्गदर्शन लाभले.


दिलीप हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील तोरणडोंगरी या आदिवासी पाड्यावरील खेळाडू आहे. उजव्या हाताने कोपरापासून तो दिव्यांग आहे. गत सात वर्षापासून नाशिकचे अॅथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी त्याला क्रीडा कामगिरीसाठी दत्तक घेतले होते. दिलीपच्या निवासासह स्पर्धेच्या आणि दैनंदिन सरावातील डाएटचा खर्चदेखील वैजनाथ काळे यांनी गत सात वर्षापासून केलेला आहे. एशियन स्पर्धेत थेट सुवर्णपदक पटकावल्यामुळे दिलीप हा 2024 मध्ये पॅरिसच्या पॅरा ऑलिम्पिक या स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. त्यामागे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांचे सात वर्षांपासूनचे मेहनत फळाला आली आहे. अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे दिलीपने पॅरा ऑलिम्पिक या क्रीडा प्रकारात 400 मीटरमध्ये भारताला कोटा मिळवून देत क्वालिफाय केले. त्यामुळे दिलीप आणि प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



पंतप्रधानांनी केले कौतुक 


पैरा एशियन गेमच्या शेवटच्या दिवशी दिलीपने सुवर्णपदकाला गवसणी घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दिलीपची कामगिरीची दखल घेत दिलीपची पोस्ट द्विटरवर शेअर करीत त्याचे अभिनंदन केले. त्याला २०२४ मध्ये पॅरिसला होणाऱ्या पॅराऑलिम्पिकमध्येदेखील नाव झळकावण्याची संधी मिळणार असून ही बाब नाशिकसह देशासाठी अभिमानास्पद आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी देखील दिलीप गावितच्या सुवर्ण कामगिरीचे कौतुक केले आहे. आमदार सत्यजित तांबे फेसबुक पोस्टद्वारे त्याचे अभिनंदन केले आहे. ते लिहितात की, आयुष्यात कितीही संकटं आली तरी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण त्यावर मात करून यशाचे शिखर गाठू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या नाशिकचा खेळाडू दिलीप महादू गावित! नाशिक जिल्ह्यातील दिलीप महादू गावित या खेळाडूने आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये पुरुषांच्या 400 मीटर T47 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचं मनापासून अभिनंदन! त्याची ही कामगिरी देशभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. दिलीपने पटकावलेल्या या सुवर्णपदकासह भारताने आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये 100 पदके जिंकून इतिहास रचला आहे!


 


Asian Para Games 2023 : आशियाई पॅरा खेळ स्पर्धेत भारतीय खेळाडूंची 'शंभर नंबरी' कामगिरी, एकूण 111 पदकांची कमाई