नाशिक : नाशिकमध्ये खुनाचे (Murder) सत्र सुरुच असून दोन दिवसांपूर्वी एका तरुणाच्या खुनाची घटना ताजी असतानाच काल (26 ऑगस्ट) रात्री उशिरा सातपूर (Satpur) परिसरात खुनाची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मित्रांनीच मित्रावर चाकूने सपासप वार करत त्याचा खून केला. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांना (Nashik Police) संशय आल्यानंतर खुनाची उकल झाली. 


नाशिक शहरात (Nashik) सध्या गुन्हेगारीचे पेव फुटले असून सातत्याने खुनाची घटनांनी शहर क्राईम सिटी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. दोन दिवसांपूर्वी एका संदीप आठवले या भाजी विक्रेत्याला भररस्त्यात संपवल्याची घटना समोर आली. यानंतर नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गस्तीपथक, चौकसभा घेऊनही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये तसूभरही कमी नाही. अशातच कार्बन नाका परिसरात शनिवारी रात्री एक खुनाची घटना समोर आली आहे. मद्यपार्टीनंतर झालेल्या किरकोळ वादातून विश्वनाथ सोनवणे या 27 वर्षीय तरुणावर मित्रांनी चाकूने हल्ल्या चढवला. 


पोलिसांना संशय आला आणि....


प्राथमिक माहितीनुसार, विशेष म्हणजे या घटनेनंतर पोलीस कारवाईच्या भीतीने मित्रांनी हा अपघात (Accident) झाल्याचा बनाव केला होता. गंभीर जखमी झालेल्या विश्वनाथला वाचवण्यासाठी दोन मित्रांनी दुचाकीवर बसवत त्याला सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात दाखल केले, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगताच त्याला ते जिल्हा रुग्णालयात घेऊन तर गेले मात्र उपचारादरम्यान विश्वनाथला डॉक्टरांनी मयत घोषित केले. दरम्यान त्याच्या शरीरावर चाकूने वार दिसताच, हा अपघात वगैरे नसून खून असल्याचा पोलिसांना संशय आला आणि मित्रांकडे सखोल चौकशी करताच त्यांनी खुनाची कबुली दिली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार ही माहिती समोर आली असून पोलीस तपासानंतर नेमकं कारण समोर येणार आहे. 


गुन्हेगारी कुठेतरी थांबली पाहिजे.... 


एकीकडे धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक नगरीत आता गुन्हेगारांची नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. शहरातील महत्वाच्या भागात गल्लोगल्ली भाईगिरी पाहायला मिळत आहे. यात अल्पवयीन मुलांचा समावेश अधिक असल्याचे दिसून येत आहे. यात विशेष म्हणजे सोशल मीडियावरील गँगवॉर थेट रस्त्यावर येऊ लागल आहे. शहर पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर मोक्का लावूनही गुन्हेगारी सुरुच आहे. त्यामुळे आता कठोरातील कठोर पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. नाशिक शहरातील नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी ही गुन्हेगारी कुठेतरी थांबली पाहिजे, अशीच अपेक्षा नाशिककर करत आहेत. 



इतर महत्वाची बातमी : 


Nashik news : नाशिक शहरात खुनाची मालिका सुरूच; अंबड परिसर पुन्हा हादरला, भरदिवसा भाजीविक्रेत्याला संपवलं!