नाशिक : नाशिक (Nashik) शहर परिसरासह जिल्ह्यातील काही भागांत वन्यप्राण्यांच्या अधिवासासाठी (wildlife) पोषक वातावरण असल्याने बिबट्यासह अनेक वन्यप्राणी आढळून येतात. मात्र अलीकडच्या काळात वन्यप्राण्यांच्या मृत्यूत (Animal Death) वाढ होत असल्याचे चित्र आहे. कधी वन्यप्राणी मानवी संघर्ष, तर कधी रस्ता ओलांडताना तर कधी आजारी असल्याने अनेकदा वन्यप्राणी मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात तब्बल एक हेक्टर परिसरात वन्यप्राणी उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच वन्यप्राण्यांवर उपचार करता येणे सोयीस्कर होणार आहे.
नाशिक आणि बिबट्या (Leopard) हे जणू समीकरण बनले आहे. बिबट्याबरोबर इतरही प्राणी पक्षी जिल्ह्यात आढळून येतात. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी केंद्र असणे आवश्यक होत. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकजवळ वन्यप्राणी उपचार केंद्र (Transit Treatment Center) उभारावे अशी मागणी होती. अखेर नाशिकजवळील म्हसरूळला (Mhasrul) वन्यप्राणी उपचार केंद्र अर्थात ट्रान्सिट ट्रिटमेंट सेंटरची उभारणी नाशिक पश्चिम वनविभागाकडून करण्यात आली आहे. पुण्यातील उपचार केंद्राच्या धर्तीवर नाशिकमध्ये जखमी वन्यप्राण्यांवर उपचाराचा मार्ग खुला झाला आहे. लवकरच या केंद्राचे लोकार्पण होण्याची दाट शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नाशिकच्या पश्चिम पट्ट्यासह निफाड (Niphad), सिन्नर, येवला भागात वन्यजीवांची संख्या अधिक आहे. गेल्या काही वर्षांत वाढलेले वन्यप्राण्यांचे अपघात आणि जखमी प्राण्यांच्या घटनांचे नियोजन करताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ होत होती. अशावेळी जखमी वन्यप्राण्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. मात्र आता नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील बिबट्यांसह मुक्ताईनगर, जळगाव, यावलसह सातपुड्यातील वाघांना नाशिकमध्ये उपचार घेता येतील. म्हसरूळ परिसरात उभारलेल्या उपचार केंद्रात निरीक्षण, ऑपरेशन थिएटर, आयसीयू, शवविच्छेदन, एक्स-रे, एमआरआय कक्ष, निरीक्षण कक्ष, औषधालयअसे स्वतंत्र कक्ष असतील. मेडिकल अँड फूड स्टोअरेज, उपचार आणि बचाव साहित्यासाठी कक्ष असतील. मृत वन्यजीवांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. या केंद्रात बिबट्यांसाठी 4 कक्ष, लांडगे, कोल्ह्यांसाठी- 5 कक्षांसह वाघांसाठी एक स्वतंत्र कक्ष असतील. विविध प्रजातीच्या पक्ष्यांसाठी 25 कक्ष असतील. माकड,वानरांसाठी-2 कक्ष असतील. तसेच केंद्रात पूर्ण वेळ पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्यात येईल.
केंद्र चालविण्यासाठी संस्थांना आवाहन
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून नाशिकच्या म्हसरूळ परिसरात वन्यजीव उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. जिल्ह्यासह विभागातील जखमी वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी हे केंद्र सुरु करण्यात येत आहे. सद्यस्थितीत या केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून महिनाभरात याचे उदघाटन होण्याची शक्यता आहे. या केंद्राचे दैनंदिनन कामकाज प्रभावीपणे चालण्यासाठी वनविभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे, पात्रताधारक संस्थांची निवड करावयाची आहे, त्यासाठी इच्छुक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र शासन वनविभागाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र वन विभागामार्फत पायाभूत सुविधा पुरविल्या जातील, तर इच्छुक पक्षाकडून सेवा पुरविल्या जातील. किमान 10 वर्षांसाठी हा करार असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :