Talathi Bharti Exam Updates: गेल्या अनेक दिवसांपासून तलाठी परीक्षा (Talathi Bharti) चर्चेत आहे. परीक्षेची तारीख जाहीर झाल्यापासूनच, या संपूर्ण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींची चर्चा जास्त झाली आहे. कधी कॉपीची कीड, तर कधी सर्व्हर डाऊनमुळे अडचणी यामुळे तलाठी परीक्षा चर्चेचा (Talathi Exam Discussion) विषय ठरली आहे. इतकं सगळं होत होत, आता सोमवारी या परीक्षेचा तिसरा टप्पा पार पडणार आहे. मात्र यावेळीही मराठा आंदोलनामुळे परीक्षार्थींच्या वाटेत अडचणींचा डोंगर उभा राहू शकतो. काही जिल्ह्यांत बंदची हाक, तर अनेक ठिकाणी एसटी बंद... त्यामुळे, तलाठी परीक्षेचं हे दिव्य कसं पार पडणार? याची परीक्षार्थींना डोकेदुखी निर्माण झाली आहे. 


राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल (रविवारी) एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी तलाठी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून मागणी केल्याचं म्हटलं होतं. परंतु, अद्याप परीक्षा पुढे ढकलण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 






ट्वीटमध्ये वडेट्टीवार म्हणाले की, "राज्यात उद्या तलाठी परीक्षा आहे, ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून मागणी केली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ उद्या बंद पुकारण्यात आला आहे. उमेदवारांना परीक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागणार आहे. मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस सरकारने बंद केल्या आहे त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भार वाढून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे तलाठी भरती परीक्षेच्या परीक्षार्थींना फटका बसू नये ,म्हणून ही परीक्षा तातडीने पुढे ढकलण्याची घोषणा सरकारने करावी."


हिंगोलीत तलाठी परीक्षेसाठी जाणारी विशेष बसफेरी रद्द, परीक्षार्थी नसल्यानं बस फेरी रद्द 


जालन्यातील घटनेनंतर मराठवाड्यातील सर्व बस सेवा ठप्प झाल्या आहेत. एकट्या हिंगोली जिल्ह्यातील 660 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. आज तलाठी भरती परीक्षेसाठी अमरावतीला जाणाऱ्या उमेदवारांच्या सोयीच्या दृष्टीनं हिंगोली आगारातून विशेष बसची व्यवस्था करण्यात आली होती. आज सकाळी ही बस साडेपाच वाजताच्या सुमारास हिंगोली आगारातून निघणार होती. परंतु बसमधून जाण्यासाठी प्रवासीच नसल्यानं अखेर ही बस सकाळी सहा वाजता रद्द करण्यात आली आहे. या तलाठी भरतीच्या उमेदवारांना कालच एक मेल प्राप्त झाला होता. त्यामध्ये वेळेच्या अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहा, अशा सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या होत्या. त्यामुळे उमेदवारांनी पर्यायी मार्ग निवडल्याचं पाहायला मिळत आहे. 


दरम्यान, मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार केल्याप्रकरणी आज संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये बंदची हाक देण्य़ात आली आहे. जालना, नांदेड, हिंगोली, सातारा, बारामती, सांगली, सोलापूर आणि अमरावतीमधल्या दर्यापूरमध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. व्यापारी आणि दुकानदारांनी बंदला प्रतिसाद देण्याचं आवाहन मराठा आंदोलकांनी केली आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI