नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याच्याशी अनेक बड्या राजकीय नेत्यांचा संपर्क असल्याचे आरोप प्रत्यारोप राजकीय वर्तुळात होत असताना अशातच नाशिक पोलिसांनी एका वाहन चालकाची चौकशी केली आहे. नाशिक (Nashik) शहरातील एका पक्षाच्या मोठ्या नेत्याचा हा वाहनचालक आहे. ललितच्या अपघातग्रस्त कारची (Accidental Car) दुरुस्ती करण्यासाठी संबंधित वाहनचालकाने मध्यस्थी केल्याचे समजते आहे. त्यामुळे नाशिकमधील माजी महापौर पोलिसांच्या रडारवर आले आहेत. 


ललित पाटील (Nashik Drug Case) हा एमडी तस्करीत उतरण्यापूर्वी नाशिकमध्ये राजकीय क्षेत्रात कार्यरत होता. दोन राजकीय पक्षांमध्ये त्याने काम केले आहे तर जिल्ह्यातील बडे नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी त्या काळात शिवसेनेत (Shivsena) प्रवेशही केला होता. याच मुद्द्यावर नाशिक शहर व जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी ललित सोबतच्या संबंधांच्या आरोप खोडून काढण्याचे प्रयत्न केले आहेत. यादरम्यान नाशिक शहर पोलिसांनी नाशिक शहरातील एका मोठ्या नेत्याच्या खाजगी वाहनचालकाची चौकशी केली. सन 2015 मध्ये ललितच्या सफारी कारचा अपघात झाला. ही कार सिडकोतल्या बडदे नगर येथील एका गॅरेजमध्ये तेव्हापासून पडून आहे. गॅरेज मालकाकडे चौकशी केल्यानंतर पोलीस एका वाहन चालकापर्यंत पोहोचले. हा वाहन चालक माजी महापौरांसाठी काम करत असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 


बहुचर्चित ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणाची पाळेमुळे नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत पसरली असून मुंबई पोलिस पथकाने (Mumbai Police) देवळा (Deola) तालुक्यातील सरस्वती वाडी येथून तब्बल 15 किलो ड्रग्ज हस्तगत केले. ललित पाटीलने पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा चालक सचिन वाघ याच्या मदतीने लोहोणेर येथे गिरणा नदीपात्रात ड्रग्जच्या 12 किलोच्या आठ बॅगा फेकल्याने त्याचाही शोध मंगळवारी पहाटे अडीच्या सुमारास मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी सुरु केला. दोन टप्प्यांत तब्बल 14 तास मोहीम राबवली. त्यानंतर आता नाशिकच्या एमडी ड्रग्जप्रकरणी गुन्हे शाखेकडून एका माजी महापौराची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समजते आहे. ललित पाटीलची जुनी गाडी या नेत्याकडे होती. मात्र, प्रकरण अंगलट येत असल्याने ही गाडी रातोरात सात वर्ष जुनी दाखवली गेल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे संबंधित नेत्याचे धाबे दणाणले आहेत. 


माजी महापौरापर्यंत पोहोचणार का? 


दरम्यान त्या काळात ललित हा पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांकडे वारंवार यायचा. तेव्हा त्याच्याशी ओळख होती. दरम्यानच्या काळात वाहनाचा अपघात झाल्यावर त्याने दुरुस्तीबाबत विचारले, तेव्हा गॅरेजमध्ये कार लावली, दुरुस्तीनंतर बिल तयार झाले, परंतु ललित पुन्हा आलाच नाही, अशी माहिती चालकांनी पोलिसांना दिल्याचे समजते.. तर संबंधित गॅरेज चालक व वाहन चालकांनी ललितला वेळोवेळी फोन केले पण, ललितने फोन न उचलल्याने कार अद्यापही भंगारत उभी असल्याचेही चौकशी समोर आले आहे. दरम्यान या चौकशीनंतर पोलीस संबंधित माजी महापौरापर्यंत पोहोचणार का? या प्रकरणातील राजकीय संबंध उघड होणार का? या संदर्भात पोलीस प्रशासन कसा तपास करतंय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Dada Bhuse : सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता, शंभूराज देसाईंपाठोपाठ दादा भुसेंनीही नोटीस धाडली!