नाशिक : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 1980-1990 चे दशक म्हणजे अंडरवर्ल्डच्या दहशतीचा काळ म्हणून ओळखला जातो, दुर्दैवाने आजही राज्यात तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा आणि नवनवीन स्वरूपातील गुन्हेगारी सध्याच्या काळात वाढलेली दिसते आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याची खंत आमदार सत्यजित तांबे यांनी बोलून दाखवली. तसेच ही सर्व परिस्थिती बघता गुन्हेगारी नियंत्रण करण्यात महाराष्ट्र मागे पडतोय का? असा सवाल देखील तांबे यांनी उपस्थित केला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुन्हेगारी फोफावली असून सातत्याने घटनांनी महाराष्ट्र हादरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी चिंतेची बाब ठरत आहे. यावर आमदार सत्यजित तांबे यांनी आसूड ओढला असून आजची परिस्थिती पाहता ही गुन्हेगारी आटोक्यात कशी आणणार असा सवाल सत्यजित तांबे यांनी उपस्थित करत सरकारला खडे बोल सुनावले आहेत. सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून ही उद्विग्नता दर्शवली आहे. ते म्हणतात की, 'महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अवघ्या दोन आठवड्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडण्याच्या घटनांवरून राज्यात ड्रग्सचा किती सुळसुळाट झालेला आहे, हे लक्षात येतं. मुंबई लोकलमधील तरुणांचा ड्रग्सची नशा करतानाचा व्हिडीओ, पुण्यातील कोयता गँग अशी अनेक प्रकरणे राज्यात गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण दाखविण्यास पुरेशा असल्याचे पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


सत्ताबदल झाला तरीही गुन्हेगारी कमी नाही... 


सत्यजित तांबे यांनी नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाबाबत जाब विचारला आहे. मागील काही घटनांचा संदर्भ देत सत्यजित तांबे सरकारला धारेवर धरले आहे. यात ते लिहितात की, '10 ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये 300 कोटींचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त, 16 ऑक्टोबर रोजी सोलापूरमध्ये 16 कोटींचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त, 19 ऑक्टोबर रोजी मुंबई 71 कोटींचे कोकेन जप्त, 22 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये 500 कोटींचे कोकेन जप्त, तर 23 ऑक्टोबर रोजी पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील ड्रग्सचा कारखाना उघडकीस आणला. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळात अनेकदा सत्ताबदल झाला! सरकारने राज्यात बदल घडविणे अपेक्षित असताना, उलट गुन्हेगारीचेच प्रमाण वाढताना दिसत आहे. 


महाराष्ट्रात दहशतीचा काळ 


पुढे सत्यजित तांबे लिहितात की, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 1980-1990 चे दशक म्हणजे अंडरवर्ल्डच्या दहशतीचा काळ म्हणून ओळखला जातो, दुर्दैवाने आजही राज्यात तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा आणि नवनवीन स्वरूपातील गुन्हेगारी सध्याच्या काळात वाढलेली दिसतेय. त्यामुळे महाराष्ट्रात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही सर्व परिस्थिती बघता गुन्हेगारी नियंत्रण करण्यात महाराष्ट्र मागे पडतोय का? असा प्रश्न उभा राहतो. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत, प्रगत राज्याला हे अजिबात शोभनीय नाही. त्यामुळे जनतेच्या सुरक्षेचा विचार करून ही वाढलेली गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे!, असेही त्यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Satyajeet Tambe : विद्यार्थ्यामागे एक हजार रुपये गोळा करता, मग फेअर आणि ट्रान्सपरंट परीक्षा का घेऊ शकत नाही, सत्यजित तांबे यांचा सवाल