नाशिक : आज गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) अखेरचा दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) असल्याने लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे. नाशिक शहरातील जुने नाशिक भागातील वाकडी बारव येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक ढोल वाजवत आनंद लुटला. तर दुसरीकडे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशाच्या वाद्यांवर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. 


अवघ्या राज्यभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साह शिगेला पोहचला असून आज लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार नाशिक (Nashik Ganesh Visarjan) शहरातील भद्रकाली येथील वाकडी बारव येथून गणपती  विसर्जन (Nashik Ganesh Visarjan) रथ मिरवणूकीची सुरवात झाली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ढोल, ताशांच्या निनादात व टाळ मृदृंगाच्या गजरात उत्साहात सुरूवात झाली. मिरवणूकीत अग्रस्थानी नाशिक महानगरपालिकेचा शासकीय मानाच्या गणपतीसह शहरातील विविध गणपती मंडळांनी सहभाग नोंदविला. लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत मिरवणूक लवकरात लवकर पुढे नेऊन निर्विघ्नपणे पार पाडावी, असे आवाहन यावेळी मंत्री दादा भुसे यांनी गणेश मंडळांना केले. 


यावेळी सुरवातीला महापालिकेच्या शासकीय मानाच्या गणपतीची मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर थेट मिरवणूकीत सहभागी होवून पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वत: ढोल वाजवून मिरवणूकीस प्रारंभ केला. याचवेळी आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी देखील ढोल हातात घेत वादन केले. त्याचबरोबर दादा भुसे यांनी मालेगावच्या प्रसिद्ध तीन पावलीवर भन्नाट डान्सही केला. सध्या गणेश विसर्जन मिरवणूक प्रारंभ झाली असून हळूहळू विसर्जन मार्गावरून पुढे सरकणार आहे. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’ असा जयघोष करत गणपती विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या गणेशमंडळांना आणि भाविकांना पालकमंत्री दादा भुसे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच  कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहनही पालकमंत्री भुसे यांनी उपस्थितांना केले. 


या मार्गावरील वाहतूक बंद


दरम्यान पारंपरीक मिरवणूक मार्गावरील वाकडी बारव, चौकमंडई, जहांगिर मशीद, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, विजयानंद थिएटर, गाडगे महाराज पुतळा, गो. ह. देशपांडे पथ, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल, अशोकस्तंभ, नवीन तांबट आळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालविय चौक, परशुरामपुरीयारोड, कपालेश्वर मंदिर, भाजीबाजार, म्हसोबा पटांगण अशी निघणार आहे. या मार्गावरील हातगाड्या, बैलगाड्या, सायकल, मोटरसायकल आदींची वाहतूक सकाळी दहा वाजेपासून ते रात्री मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे. वरील सर्व निर्बंध रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने व मिरवणूक मार्गाच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या वाहनांना लागू राहणार नाहीत, असे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी म्हटले आहे.



इतर महत्वाची बातमी : 


Nashik News :नाशिक गणेश विसर्जन मिरवणुकीवर पावसाचे सावट, तीन दिवसांपासून धुवाँधार, आज पावसाचा अंदाज काय?