नाशिक : नाशिकमधून (Nashik) मोठी बातमी समोर येत असून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा (Naresh Karda) यांचे बंधू मनोहर कारडा यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी फसवणुकीप्रकरणी (Fraud) नरेश कारडा यांच्यासह बंधू मनोहर कारडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातच मनोहर कारडा यांनी टोकाचा निर्णय घेतल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


नाशिकचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्यावर सव्वा कोटीच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यात त्यांच्या भावासह अन्य दोघांवर देखील गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर लागलीच नरेश कारडा यांना मुंबई नाका पोलिसांनी (Mumbai Naka Police) अटक केली होती. त्यानंतर त्यांना पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. या तक्रारीनंतर त्यांच्या विरोधात आणखी 15 तक्रार अर्ज आले. त्या अर्जामध्ये कारडा व त्यांच्या भावांची देखील नावे होती. परिणामी या प्रकरणामुळे नरेश कारडा यांचे भाऊ मनोहर कारडा यांनी देवळाली कॅम्पजवळील (deolali Camp) बेलत गव्हाण येथे धावत्या रेल्वे गाडीखाली जात आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले. या घटनेमुळे बांधकाम क्षेत्रासह नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.


दरम्यान दोन दिवसांपूर्वी मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल एका फसवणुकीच्या गुन्ह्यात संशयितांमध्ये मनोहर यांचेही नाव आहे. आर्थिक गुन्हे शाखेने त्यांचे भाऊ नरेश कारडा यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. कारडा बांधकाम समूहाच्या संचालकांपैकी एक असलेले मनोहर कारडा यांनी बेलतगव्हाण रेल्वे गेटजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीसमोर येत आत्महत्या केली. मालगाडीपुढे अचानक आलेल्या व्यक्तीच्या अपघाताची माहिती चालकाने कळवली. यानंतर रेल्वे पोलिसांनी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पंचनामा करून शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. काही वेळातच मनोहर कारडा असल्याचे देखील समोर आले. त्यांच्या मृतदेहावर आज सकाळी अकरा वाजता देवळलीगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 


आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट


दरम्यान फसवणुकीच्या गुन्ह्यात मनोहर कारडा यांचे देखील नाव आहे. त्यातच त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली. मात्र त्यांच्या आत्महत्येमागील निश्चित कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. तर कारडा हे दुपारपर्यंत त्यांच्या कार्यालयात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ते देवळाली गावाजवळील बेलतगव्हाणच्या रेल्वेगेटकडे गेल्याचे बोलले जात आहे. मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यात संशयितांमध्ये व्यवस्थापकीय संचालक मनोहर कारडा यांचेही नाव होते. याच तणावातून कारडा यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Nashik : नाशिकचे बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना अटक; चार दिवसांची पोलीस कोठडी, काय आहे प्रकरण?