Onion News : सध्या कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. केंद्र सरकारच्या धोरणात सातत्याने होणारे बदल तसेच दिवाळी सणानिमित्ताने लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंद राहणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळं नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर झाला आहे. सरासरी कांद्याच्या दरात 800 ते 900 रुपयांची घसरण झाली आहे.
केंद्र सरकारने कांद्याच्या किमान निर्यात मूल्य दरात 800 डॉलर प्रति टन किंमत केली आहे. तसेच सरकारनं नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून दोन लाख मॅट्रिक टन कांदा किरकोळ बाजारात विक्रीसाठी आणला आहे. हा कांदा 25 रुपये दराने विक्री करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा हा परिणाम कांद्याच्या दरांवर झाल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मागील सप्ताहाच्या तुलनेत कांद्याच्या सरासरी दरात टप्प्याटप्प्याने 800 ते 900 रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याचे दर हे चार हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत दररोज एक लाख क्विंटल कांद्याची आवक होत आहे. गेल्या पाच दिवसात पाच लाख क्विंटल मागे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साधारण 35 ते 40 कोटी रुपयांचा तोटा बसल्याचे दिसून येत आहे.
दिवाळीपूर्वीच कांद्याबरोबरच इतर भाज्यांनाही मागणी वाढली
दिवाळीपूर्वीच कांद्याबरोबरच इतर भाज्यांनाही मागणी वाढली आहे. त्यामुळे काही दिवसांत कांद्याचे दर दुपटीनं वाढले आहेत, तर इतर भाज्यांचे भाव पुन्हा एकदा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यानं सांगितलं की, सध्याच्या महागाईला आळा घालण्यासाठी सरकार आपल्या बफर स्टॉकमधून सुमारे 16 शहरांमध्ये कांद्याची विक्री सुरू ठेवेल. कांद्याची किंमत कमी करण्यासाठी सरकारनं 28 ऑक्टोबर रोजी किमान निर्यात शुल्क (MEP) 800 डॉलर निश्चित केलं आहे. या लादलेल्या शुल्कामुळे सर्वोच्च किंमतीतून 5 ते 9 टक्क्यांनी घट झाल्याचं सरकारचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात कांद्याच्या घाऊक भावात 4.5 टक्क्यांनी घट झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: