नाशिक : एकीकडे गणेशोत्सवाचे (Ganeshotsav) दिवस असून आगामी काळात अनेक सण उत्सव येऊ घातले आहेत. अशातच नाशिक (Nashik) शहरात मात्र मिठाईच्या नावावर नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. आता गुजरातहून (Gujrat) नाशिकमध्ये येत असलेला हलवा (Halwa) आणि खडोल या मिठाईत भेसळ असल्याच्या संशयाने अन्न व औषध प्रशासन विभागाने साठा जप्त केला आहे.


गणेशोत्सवात (Ganesh Chaturthi 2023) दुग्धजन्य पदार्थांसह मिठाईला असलेल्या मागणीचा फायदा उठवत शहरातील काही विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्यात येत आहे. ही भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (Food And Drug) विभागाच्या वतीने तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या सहकार्याने नाशिक- पेठ रस्त्यावर एका वाहनाचा संशय आल्याने तपासणी केली. यात गुजरातमधून (Gujrat) सणासुदीच्या काळात हलवा आणि खडोल या मिठाईचा साठा वाहनातून नाशिक शहरात विक्रीसाठी आणण्यात येत होता. पथकाने 50 पिशव्यांमधील साठ्याची वाहनातच तपासणी केली. अन्न पदार्थाच्या (Adulteration) वाहतुकीचा परवाना संबंधितांकडे आढळून आला नाही. या कारवाईतून सुमारे दोन लाख 39 हजार 600 रुपयांचा एक हजार 198 किलो हलवा आणि 62 हजार 580 रुपयांचा खडोला असा एकूण तीन लाख दोन हजार 180 रुपयांचा खाद्यसाठा जप्त करण्यात आला.


सण उत्सवाच्या काळात मलई पेढे, मलई बर्फी (Burfi) किंवा ईतर मिठाईचे पदार्थ खरेदी करत असाल तर जरा काळजी घ्या असं म्हणण्याची वेळ आता आली आहे कारण दुधाच्या नावाखाली विक्री होणाऱ्या या मिठाईत दुधाचा वापर न करता गुजरातच्या एका पदार्थाचा वापर केला जात असल्याचा अन्न व औषध प्रशासन विभागाला संशय असून गेल्या काही दिवसात हा पदार्थ मोठ्या प्रमाणावर जप्तही करण्यात आला आहे. यासोबतच गेल्या दीड महिन्यातच प्रशासनाचे 21 छापे आणि त्यात समोर आलेली माहिती नक्कीच चिंता वाढवणारी आहे. गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये  (Nashik FDA) अन्न व औषध प्रशासन विभाग आणि नाशिक पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर हे पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात 15 सप्टेंबरला एका खासगी ट्रॅव्हल्सच्या बसमधून हे पदार्थ जप्त करण्यात येऊन त्यानंतर नाशिक शहरातील विविध विक्रेत्यांकडून देखील हे पदार्थ ताब्यात घेण्यात आले होते.


दुधाचे पदार्थ नावालाच.... ?


विशेषतः या पदार्थ्यांची वाहतूक गुजरातमधूनच होत असल्याचं समोर येत आहे. या मिठाई सारख्या पदार्थाचा वापर नाशिक शहरातील मिठाई विक्रेते मलई पेढा, मलई बर्फी, कलाकंद आणि ईतर मिठाई सारखे पदार्थ बनवण्यासाठी वापरत असल्याचा प्रशासनाला दाट संशय असून कुठल्याही प्रकारच्या दुधाचा यात समावेश नसल्याने तसेच या पदार्थ्यांची वाहतूक करतांना अन्न, सुरक्षा व मानके कायद्याच्या तरतुदीचा भंग केला जात असल्याने प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते आहे. तसेच तीनच आठवड्यांपूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwer) अन्न व औषध प्रशासन विभागाने भीमाशंकर पेढा सेंटरवर धाड टाकत रिच स्वीट डिलाईट एनलॉग या अन्न पदार्थाच्या 10 किलोच्या 8 बॅग जप्त केल्या होत्या. यात धक्कादायक बाब म्हणजे या पदार्थाचा आणि दुधाचा काहीही संबंध नसतांनाच त्यापासून तयार केलेला पेढा विक्रेता मलाई पेढा नावाने विक्री करत ग्राहकांची फसवणूक करत होता असे समोर आले होते.        


दोन महिन्यातील कारवाई 


1 ऑगस्ट 2023 ते 21 सप्टेंबर 2023 या 50 दिवसात नाशिक जिल्ह्यात तब्बल 25 छापे टाकण्यात आले आहेत. यात दूध, दुग्धजन्य पदार्थ, भेसळकारी पदार्थ आणि ईतर असा एकूण 16 लाख 19 हजार 123 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. भेसळयुक्त दुधाच्या संशयावरून 4 छाप्यात 3 हजार 332 लिटर दूध नष्ट करण्यात आले आहे. भेसळकारी पदार्थाबाबत 3 छाप्यात 3 हजार 876 किलो जप्त करण्यात आले. दुग्धजन्य पदार्थात भेसळीवरून 13 छाप्यात 4 हजार 360 किलो माल हस्तगत करत त्यातील 9 लाख 37 हजारापैकी 4 लाखाचा माल नष्ट करण्यात आला आहे. ईतर नमकीन, प्रोटीन्सबाबतही कारवाया करण्यात आल्या आहेत


मिठाई खरेदी करतांना काळजी घेण्याचे आवाहन 


दरम्यान नागरिकांनी मिठाई खरेदी करतांना खरोखर त्यामध्ये दूध, खवा, मलई किंवा ईतर दुग्धजन्य पदार्थांचा वापर केला आहे की नाही? व्यवसायिकांकडून सर्व नियम व अटीचे पालन केले गेले आहे का? याची खात्री करावी. तसेच मिठाई विक्रेत्यांनी दुधापासूनच मिठाईची विक्री करावी किंवा दुधापासून मिठाई बनवली नसल्यास तसे स्पष्ट फलक दुकानात लावावे, अशा सूचना मिठाई विक्रेत्यांना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव, नवरात्र, दीपावली या काळात नागरिकांकडून मिठाई खरेदीला पसंती दिली जात असल्याने मिठाई व्यावसायिकांची देखिल या काळात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र नाशिकमधील एकंदरीतच ही सर्व परिस्थिती बघता मिठाई व्यवसायिकांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता मिठाई खरेदी करतांना योग्य ती काळजी आणि खबरदारी घेतल्यास फसवणूक होण्यापासून ते नक्कीच वाचू शकतील यात शंका नाही..



इतर महत्वाची बातमी : 


Nashik : तुम्ही पित असलेल्या दुधात भेसळ तर नाही ना? कपडे धुण्याच्या सोड्यापासून बनवलं जातंय दूध, नाशिकमधील प्रकार