Aurangabad News : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात दूध विक्री व दुग्धजन्य पदार्थ विक्री करतांना त्यात भेसळयुक्त तसेच मुदतीनंतर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दूध संकलित व वितरीत होणाऱ्या तसेच बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या दूधाचे नमुने तपासा असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीची बैठक बुधवारी पार पडली, यावेळी ते बोलत होते. 


या बैठकीत दूध व दुग्धजन्य पदार्थ तपासणी कार्यवाहीबाबत प्राथमिक स्वरुपाची रुपरेषा ठरविण्यात आली. तसेच समितीने धडक कार्यवाही पुर्व तयारीचा आढावा घेतला. दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीविरोधात कारवाई करतांना भेसळ प्रक्रियेत सहभागी व्यक्ती व आस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे ठरले. तसेच दूध संकलित व वितरीत होणाऱ्या तसेच बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या दूधाचे नमुने तपासा असे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत. 


बैठकीतील निर्णय...



  • दूध विक्रेते, मिठाई विक्रेते, दुग्धजन्य पदार्थ विक्रेते यांनी विक्री करत असलेले दूध व दुग्धजन्य पदार्थ हे उच्च दर्जाचे व भेसळविरहीत निर्माण होतील यासाठी विशेष व्यवस्था निर्माण करावी.

  • अशा पदार्थांच्या वापराची मुदत नमूद असावी. असे मुदतपूर्व दिनांक पदार्थांच्या पॅकेटवर नमुद असणे बंधनकारक आहे.

  • यासंदर्भात जिल्ह्यात खवा, मावा इ. दूध व दुग्धजन्यपदार्थ विक्री होत असलेल्या ठिकाणी नियमित तपासणी करुन जिल्हास्तरीयसमिती मार्फत अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कारवाई करावी, असे निर्देश अरविंद लोखंडे यांनी दिले.


जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात भेसळ... 


औरंगाबाद जिल्ह्यात हजारो लिटर दूध इतर जिल्ह्यातून येत असतो. तर दुग्धजन्य पदार्थ आणि मिठाई यातून तयार होते. मात्र, अनेकदा दूधात आणि यातून तयार करण्यात येणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. वेळोवेळी झालेल्या कारवाईतून हे समोर आले आहेत. विशेष म्हणजे, सणासुदीच्या काळात असे प्रकार मोठ्याप्रमाणात समोर येत असतात. त्यामुळे आता शहरात येणाऱ्या दूधाची तपासणी केली जाणर आहे. 


कारवाईच होत नाही...


औरंगाबाद जिल्ह्यात दूध विक्री व दुग्धजन्य पदार्थ विक्री करतांना त्यात भेसळयुक्त तसेच मुदतीनंतर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या निर्णय जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्या  बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात अशी कारवाई होतांना दिसत नाही. दिवाळीसह इतर सणासुदीच्या काळात मोजक्या छोट्या-छोट्या कारवाईच्या पलीकडे मोठी कारवाई  होतांना दिसत नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Conjunctivitis : डोळ्याची साथ सुरु आहे, मग 'हे' औषध घेण्याचे टाळा; आरोग्य विभागाने केलं आवाहन