नाशिक : येवला (Yeola) शहरात मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी फुलांची उधळण करताना जेसीबीच्या बकेटमधून कोसळल्याने कार्यकर्ते जखमी झाले. सर्वाना जबर दुखापत झाली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) अवघा महाराष्ट्र पिंजून काढणारे जरांगे पाटील नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. आज त्यांची छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) मतदारसंघात जाहीर सभा होत आहे. यासाठी पंचक्रोशीतील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित लावणार आहेत. मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी येवलेकरांनी जय्यत तयारी केली असून याच दरम्यान अपघाताची घटना समोर आली.
स्वागताची तयारी सुरु असताना अचानक एका जेसीबीची समोरील बाजूस असलेली लोडर बकेट खाली आल्याने जेसीबीवर असलेले चौघेही खाली पडल्याने अपघात झाला. यात चारही जण गंभीर जखमी झाले आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) सध्या राज्याचा दौरा करत आहेत. गावागावात, चौकाचौकात मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागतही होत आहे. आज मनोज जरांगे-पाटील नाशिक जिल्ह्यात (Nashik) येवला येथे दाखल झाले आहेत. सभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांचे जेसीबीवरुन फुलांची उधळण करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. यासाठी जवळपास पंधरा ते सोळा जेसीबी स्वागतासाठी उभे होते. या जेसीबीमध्ये काही कार्यकर्ते पुष्पवृष्टीसाठी सज्ज झाले असतांनाच जेसीबीच्या बकेटवरील ऑपरेटरचे नियंत्रण सुटल्याने चार कार्यकर्ते खाली पडून गंभीर जखमी झाले. या कार्यकर्त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतरही कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही, जरांगे पाटलांचे आगमन होताच पुन्हा पुष्पवृष्टी करण्यात आली.
ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे...
आम्ही ओबीसी मध्येच (OBC) आहोत, कुणबी मराठा आहोत. त्यामुळे ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. आणि या मागणीला कुणी ओबीसी नेते विरोध करत असतील तर त्याला अर्थ नाही, असे सांगत नियोजित येवला येथील सभेचा रूट ठरला होता म्हणून जातो आहे. येवल्यात जातोय, यात वेगळे काही नाही. समता परिषदेने विरोध केला, हा द्वेष का पसरवित आहेत. याचा अर्थ तुम्ही संविधानिक पदाचा गैर वापर केला जात आहे. एकीकडे चार दिवसांत कायदा पारित होणार नाही, म्हणून आम्ही त्यांना 40 दिवस दिले आहेत. 1 महिना 14 तारखेला पूर्ण होतो आहे, त्यामुळे सरकारने गांभीर्याने घ्यावे, असं जरांगे म्हणाले.
इतर महत्वाची बातमी