नाशिक : नाशिक जिल्ह्यावर (Nashik) पुन्हा एकदा शोककळा पसरली असून चांदवड तालुक्यातील जवानास वीरमरण आले आहे. चांदवड तालुक्यातील हरनूल येथील भारतीय सैन्य दलातील जवान श्रीनगरला कार्यरत असताना कुस्तीचा सराव सुरु असताना दुर्दैवी निधन झाले आहे. वयाच्या 25 वर्षी जवान विक्की अरूण चव्हाण यांच्या निधनाने चव्हाण कुटुंबासह संपूर्ण हरनूल गावावर शोककळा पसरली आहे. 


नाशिक जिल्ह्यातून असंख्य जवान भारतीय सैन्यदलात (Indian Army) कार्यरत असून नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक आहे. मात्र गेल्या काही महिन्यात जवानांचे अपघाताच्या माध्यमातून निधन होण्याच्या घटना घडत आहे. याच जिल्ह्यातील चांदवड (Chandwad) तालुक्याने भारतीय लष्कराला अनेक जवान दिले आहेत. या मातीतील असलेला हरनूल येथील जवान विक्की चव्हाण यांना वीरगती प्राप्त झाली आहे. जवान विक्की अरूण चव्हाण श्रीनगर येथील पुंछ राजोरी येथे महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. ते स्वतः कुस्तीपटू असल्याने अनेक स्पर्धांच्या निमित्ताने सराव करत असायचे. काल सायंकाळी कुस्तीचा सराव सुरु असताना त्यांना वीरगती (Martyres) प्राप्त झाली आहे. 


विक्की चव्हाण (Vicky Chavhan) हे बारावी पास झाल्यानंतर भारतीय लष्करात दाखल व्हायचंय, असा चंग बांधून ते भारतीय सैन्यात दाखल झाले. गेल्या साडे चार वर्षांपासून ते भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. श्रीनगर येथील पुंछ राजोरी येथे महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. पहिल्यापासून कुस्तीची आवड असल्याने ते भारतीय सैन्य दलाकडून देखील कुस्ती खेळत असत. याच माध्यमातून चव्हाण यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत (National Kusti Championship) निवड झाली होती. त्यामुळे ते रोजच कुस्तीचा सराव करत असत. पुढील महिनाभरात ही स्पर्धा होणार होती. त्यामुळे चव्हाण यांची जोरदार तयारी सुरु होती. नेहमीप्रमाणे काल सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास कुस्तीचा सराव सुरु असताना अपघात झाला, यात चव्हाण यांना वीरगती प्राप्त झाली. या घटनेची माहिती चव्हाण कुटुंबीयांना चांदवडला कळविण्यात आली. बातमी ऐकून चव्हाण कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. 


काही दिवसांपूर्वीच सुटीवर येऊन गेले होते... 


दरम्यान विक्की चव्हाण आपल्या स्वभावामुळेच पंचक्रोशीत ओळखीचा होता. बारावीनंतर त्यांनी भारतीय सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तो रुजूही झाला. मागील साडे चार वर्षांपासून तो श्रीनगर येथील महार रेजिमेंटमध्ये तैनात होता. महिनाभरापूर्वीच सुट्टीनिमित्त गावाकडे येऊन गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. चव्हाण यांना कुस्तीची आवड असल्याने ते राष्ट्रीय स्तरावर पोहचले होते, याच स्पर्धेच्या निमित्ताने सराव सुरु असताना दुर्दैवी घटना घडली. विक्की यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली असून कुटुंबिय देखील दुःखात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. विक्की चव्हाण यांचे पार्थिव आज रात्री मुंबई विमानतळ येथे पोहचेल. त्यानंतर उद्या चांदवड तालुक्यातील हरणूल येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Nashik News : नाशिक जिल्ह्याच्या सुपुत्रास वीरमरण; अवघ्या 29व्या वर्षी जवान अजित शेळके शहीद