नाशिक : पावसाने (Rain) सुमारे दीड महिना दडी मारल्याने सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या आगमन झाल्याने नागरिक सुखावले आहेत. मालेगाव परिसरात पाऊस सुरू असल्याने मोसम आणि गिरणा नदीला (Giran river) हंगामातील मोठा पूर आला आहे. त्यामुळे मालेगाव (Malegaon) शहरातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिकच्या (Nashik) मालेगाव शहरातून वाहणाऱ्या गिरणा आणि मोसम नदीच्या (Mosam River) उगम क्षेत्रात पावसाने जोर धरला असून सातत्याने पाऊस बरसत आहे. चणकापूर, पुनंद आणि हरणबारी या तिन्ही मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने मालेगावातून वाहणाऱ्या मोसम आणि गिरणा नदीला यंदाच्या हंगामातील मोठा पूर आला आहे. या पूर पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मोसम गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच, सटाणा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सर्वत्र मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू असून हरणबारी धरणातून (Haranbari Dam) मोसम नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सटाणा तालुक्यातील मुल्हेर ते शेवरा या गावांना जोडणारा पुल हा या पावसामुळे पाण्याखाली गेला आहे.
कळवण (Kalwan) तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, चणकापूर आणि पुनंद प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने हजारो क्युसेकने पुराचे पाणी गिरणा आणि पुनंद नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील पुनंद, गिरणा, बेहडी आणि तांबडी नद्या तसेच म्हशाड नाला खळखळून वाहत असल्याने काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सप्तश्रृंग गडावर (saptshrungi Gad) सातत्याने पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. मार्केडपिंप्री व नांदुरी लघू पाटबंधारे प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे आळंबे फरशी पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे कळवण-नाशिक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. नाशिककडे जाणारी वाहने अभोणा मार्गाने मार्गस्थ झाली. चणकापूर व पुनंद धरणातून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील अनेक गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.
देवळा तालुक्यातही समाधानकारक पाऊस
तसेच देवळा तालुक्यात ठिकठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावल्यानंतर, तीन महिन्यांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला होता. नंतर गुरुवारसह शुक्रवारी देखील चांगला पाऊस झाल्यामुळे शिल्लक खरीप पिकांना जीवदान मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. देवळा तालुक्यात जून महिन्याच्या पूर्वार्धात थोड्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर पावसाने दडी मारली होती. गत आठवडाभरापासून वातावरणातील उष्मा वाढला होता. कुठे मेघ, तर कुठे लख्ख प्रकाश, असे अनुभवयास मिळत होते. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र यापूर्वीच बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग आदी खरीप पिके पूर्णपणे करपून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 10 ते 15 टक्के शेतकऱ्यांना आपली खरीप पिके वाचविण्यात यश मिळाले होते, त्या पिकांना पावसाचा फायदा झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :