नाशिक : अखेर गेल्या दोन महिन्यांपासून पाठ फिरवलेल्या पावसाने नाशिकसह जिल्हाभरात जोरदार कमबॅक केले आहे. काल रात्रीपासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने पुनरागमन केल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. तर जिल्ह्यातील शेतीपिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला असून पुढील तीन दिवस पावसाचे असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. 


गेल्या तीन आठवड्यांपासून गायब झालेल्या पावसाने गुरुवारी पुनरागमन केले. नाशिक शहरासह ग्रामीण भागातही मुसळधार पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याने दिलासा मिळाला. पाण्याअभावी मान टाकू लागलेल्या पिकांनाही या पावसामुळे जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. काल रात्रीपासून पावसाने सुरुवात केली असून यामुळे खरीप पिकांसाठी दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून उघडीप दिलेल्या पावसाने नाशिककरांवर आभाळमाया केली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात 8 आणि 9 सप्टेंबरला हवामान विभागाने यलो अलर्टचा इशारा दिला आहे.


यंदा जूनपासून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रत्येक महिन्यात पाऊस सरासरीदेखील गाठू शकलेला नाही. अलनिनो वादळाचा प्रभाव जाणवला. याचा फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसला. पावसाला विलंब झाल्याने पेरण्याही उशिराने झाल्या. नंतर पुन्हा पाऊस गायब झाला. त्यामुळे मका, सोयाबीन, भात पिकासह खरिपातील बहुतांश पिके जळून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. अखेर गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या नाशिककरांसाठी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाचा 'यलो अलर्ट' ही गोड बातमी ठरली आहे. गुरुवारी मध्यरात्री 2 वाजेपासून सुरू झालेल्या सरींचा वर्षाव पहाटेपर्यंत जोरात सुरू आहे. 


नाशिककर सुखावले 


नाशिककर पावसाची आतुरतेने वाट बघत होते. मात्र दहा ते बारा दिवसांपासून शहरात कमाल, किमान तापमानात सतत वाढ होत राहिली. आकाश निरभ्र राहत होते. यामुळे पावसाच्या वातावरणाचे कुठलेही चिन्हे दिसत नसल्याने नाशिककर चिंतीत झाले आहे. जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पाऊस झालेला नाही. या हंगामात गोदावरी अजून एकदाही दुथडी भरून वाहताना नाशिककरांना बघता आलेली नाही. गेल्यावर्षी सप्टेंबरपर्यंत गोदावरीला किमान तीन ते चारवेळा पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. रामसेतू पुलावरून पाणी वाहून गेले होते.


पुढील दोन दिवस पावसाचे


नाशिक जिल्ह्यासाठी गुरुवार ते शनिवारपर्यंत हवामान खात्याकडून यलो अलर्ट दर्शविण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची सुरवात झाली आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचे असणार असून गुरुवारी जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला होता. शुक्रवार आणि शनिवारीदेखील हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानुसार गुरुवारी रात्रीपासून पावसाने सुरवात केल्यानंतर आज सकाळपर्यंत पावसाची संततधार सुरूच आहे. पुढील तीन ते चार दिवस हे पावसाचे राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik : नाशिक जिल्ह्यातील 92 पैकी 55 मंडळात 21 दिवसांपासून पाऊस नाही, 40 टक्के पाऊस कमी, शेतीपिकांना मोठा फटका