नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) 23 ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला असून, यात सर्वाधिक जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे (Udhhav Balasaheb Thackeray) गटाकडे गेल्या आहेत. तर, दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस (Congress) असून, त्यानंतर शरद पवार गटाने 2 जागा जिंकून तिसऱ्या नंबरचे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, यात मनसेने (MNS) खाते उघडले असून, दुसरीकडे भाजपने (BJP) तीन जागा जिंकल्या आहेत. तर अजित पवार गटाला एक जागा जिंकता आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) 48 ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा सुरु असून, यातील 3 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 45 ग्रामपंचायतीसाठी कालच मतदान प्रक्रिया पार पडली. जवळपास 82 टक्के इतके मतदान झाले. यानंतर आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरवात झाली. यानंतर हळूहळू एक एक ग्रामपंचायत निवडणुकीचा (Gramapchayat Election 2023) निकाल हाती येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून, यामध्ये पक्षीय बलाबल समतोल असल्याचे दिसून आलं आहे. आतापर्यत 23 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून, यात काँग्रेस (Congress) आणि ठाकरे गटाचे सर्वाधिक चार चार जागा जिंकत आघाडीवर आहे. तर भाजपाला तीन जागा मिळाल्या आहेत. अजित पवार गटाला एका जागेवर समाधान मानावे लागल्याचे चित्र आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 48 पैकी 03 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर काल 45 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच 15 ग्रामपंचायतीमधील (Grampanchyat) सरपंच आणि सदस्यांच्या 18 रिक्त जागांसाठी मतदान पार पडले होते. यानंतर आज सकाळी 8 वाजेपासून तर काही ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली. आता विजयी उमेदवारांचे निकाल हाती येत आहेत. यातील नाशिक तालुक्यातील पिंपळगाव गरुडेश्वर ग्रामपंचायतीत बाळू वाळू डंबाळे (शरद पवार गट) विजयी झाले असून, बागलाण तालुक्यातील भवाडे ग्रामपंचायतीत अनिल तुळशीराम मोरे विजयी झाले आहेत. तर इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो ग्रामपंचायतीत ठाकरे गटाच्या अनिता राक्षे विजयी झाल्या आहेत. तसेच नाशिक तालुक्यातील सुभाषनगर ग्रामपंचायतीवर अपक्षांचा झेंडा फडकला असून, याठिकाणी अपक्ष उमेदवार मनीषा फसाळे सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. याशिवाय सटाणा तालुक्यातील चिराई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या शकुंतला पाटील विजयी झाल्या आहेत. तर देवळा तालुक्यातील 2 ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आली आहे. तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मंगलाताई मोहन बेंडकोळी यांची सोमनाथ नगर ग्रामपंचायतपदी सरपंचपदी निवड झाली आहे.
इगतपुरी तालुक्यात मनसेने खाते उघडले
इगतपुरी तालुक्यात मनसेने खाते उघडले असून, मोगरे ग्रामपंचायतीवर सरपंचपदी मनसेचे प्रताप विठ्ठल जाखेरे विजयी झाले आहेत. तर ओंडली ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकला असून, सरपंचपदी प्रकाश वाळू खडके विजयी झाले आहेत. तर दौडत ग्रामपंचायतीवर काँग्रेसची बाजी मारली असून सरपंचपदी पांडू मामा शिंदे विजयी झाले आहेत. कृष्णनगर ग्रामपंचायतीवर सरपंचपदी अपक्ष उमेदवार वैशाली सचिन आंबावने विजयी झाल्या आहेत. या विजयाने विद्यमान आमदार हिरामण खोसकर व माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना धक्का बसला आहे. कुशेगाव ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवार विजयी झाले असून, एकनाथ गुलाब कातोरे सरपंच पदी विराजमान झाले आहेत. लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाच्या सावित्री सोमनाथ जोशी सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. घोटी खुर्द ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला असून, सरपंचपदी काँग्रेसच्या माणिक निवृत्ती बिन्नर विजयी झाले आहेत. तर इगतपुरीच्याच टाके घोटी ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाची सत्ता आली आहे.
असं आहे पक्षीय बलाबल
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील तेवीस ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून, यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे चार जागा, काँग्रेसकडे चार जागा, भाजप 3 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट - 1, राष्ट्रवादी शरद पवार गट - 2, शिवसेना शिंदे गटाकडे 2 जागा, मनसेकडे 2 जागा, तर अपक्षांकडे 4 जागा गेल्या आहेत. अजूनही 25 ग्रामपंचायतीचा निकाल बाकी असून, काही तासांत सर्व निकाल आल्यानंतर नाशिक जिल्ह्यात कुणाचं पारडं जड हे स्पष्ट होणार आहे.