नाशिक : नाशिकच्या निफाड तालुक्यात (Niphad) व्यापाऱ्यांचे मार्गदर्शक बनून शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांची ओझर पोलिसांची पिंपळगाव परिसरात बाजार समिती आवारात धिंड काढली. या प्रकरणातील तिघा व्यापाऱ्यांना पोलीस कोठडी मिळाली असून पोलिसांच्या कारवाईचे परिसरातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना चाप बसणार आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांत शेतकऱ्याच्या फसवणुकीच्या (Farmers) अनेक घटना समोर आल्या असून याबाबत पोलिसांनी (Nashik Rural Police) वारंवार शेतकऱ्यांना सूचित केले आहे. मात्र तरीदेखील फसवणुकीच्या घटना निदर्शनास येत आहेत. याच पार्श्वभूमीवर ओझर पोलिसांनी फसवणूक प्रकरणातील काही व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. त्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी धडा शिकवत बाजार समिती (Bajar Samiti) आवारातून ओळख परेड केली आहे. फसवणूक करणाऱ्या तिघांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केलेल्या बळीराजा सन्मान मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी निफाड तालुक्यातील शेतकरी दिपक सुदाम उगले यांच्याकडे संशयित मनोज साहु याने बी. के. फ्रुट कंपनीमार्फत लद्राक्षबागेत जाऊन द्राक्षमालाचा 4500 रुपये क्विटल दराने व्यवहार ठरविला होता. संशयित मनोजने तक्रारदारास द्राक्षमालाचे पहिल्या दिवशी 83 हजार रुपये रोख देऊन विश्वास संपादन करून 202 क्विंटल 80 किलो द्राक्षमाल नेला. द्राक्षमालाच्या उर्वरित आठ लाख 29 हजार 600 रुपये रकमेचा आयसीआयसी बँकेच्या पिंपळगाव बसवंत शाखेचा धनादेश दिला. तक्रारदाराने धनादेश वटविण्यासाठी पत्नीच्या खात्यात टाकला असता तो वटला नाही. इतर संशयितांना वारंवार विचारणा करुनही उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने याप्रकरणी शेतकऱ्यांनी ओझर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने संशयितांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रामीण पोलिसांकडून आवाहन
दरम्यान, संशयितांना पिंपळगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयाने संशयितांना पोलीस कोठडी सुनावल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर संशयितांना पिंपळगाव बाजार समितीत नेऊन शेतकऱ्यांना ओळख करून देण्यात आली. भविष्यात अशा व्यापाऱ्यांशी कुठलाही व्यवहार करू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी केले. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सुरू केलेल्या बळीराजा सन्मान मदत वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडे अडकलेले पैसे मिळवून दिले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांचे पैसे बाकी असतील त्यांनी तक्रारी देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.