Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची (Tomato Farmers) सध्या सर्वत्र चर्चा आहे. ज्या टोमॅटोने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले, आज त्याच टोमॅटोने शेतकऱ्यांना लाखपती करोडपती बनवलं आहे. सोशल मीडियावर तर सिन्नर तालुक्यातील धुळवड गावाच्या शेतकऱ्यांची तुफान चर्चा आहे. मात्र या मागची संघर्षगाथाही तेवढीच मोठी आहे. 


मंडळी आजवर तुम्ही नेत्यांच्या अभिनंदनाचे बॅनर (Banner) बघितले असतील, एखाद्या भाईच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाचे फलक पाहिले असतील, एखादा पठ्ठा परीक्षेत पास झाल्यानंतर मित्रांनी केलेल्या कौतुकाचे होर्डिंग्ज पाहिले असतील. मात्र शेतकऱ्यांच्या अभिनंदनाचे फलक क्वचितच नजरेस पडतात.. असाच एक फलक सिन्नर तालुक्यातील धुळवड गावात लागला होता, त्याची चर्चा सुरू होताच तो तत्काळ काढून घेण्यात आला. पण या होर्डिंग्जचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि धुळवड (Dhulvad Village) गाव सातासमुद्रापार पोहचले. नादखुळा शेतकऱ्यांच्या बॅनरवर सरपंच उपसरपंच, ग्रामस्थांच्या फोटोसह 'होय आम्हीं करोडपती, लखपती, धुळवडकर या आशयाचा हा होर्डिंग्ज होता. 


सिन्नर (Sinnar) तालुक्यात धुळवड या 1400 ते 1500 लोकसंख्या असणाऱ्या गावात 90 टक्के टोमॅटोची (Tomato Farm) शेती केली जाते. ही शेती सपाट जमिनीवर, काळ्या मातीत नाही तर डोंगररांगेवर, खडकाळ जमिनीवर शेती करण्याचे धाडस ग्रामस्थांनी दहा वर्षांपूर्वी दाखवले. जेसीबी पोकलनच्या साहाय्याने डोंगर फोडून जमीन शेती योग्य केली. वीज, माती पाण्याच्या व्यवस्था करून लाखो रुपये खर्च केले. आज त्याचे फळ त्यांना मिळतं आहे. या डोंगर रांगेत 800 ते 900 एकर परिसरात टोमॅटो पिकविला जातो. नजर जाईल तिथे डोंगर आणि डोंगराच्या कुशीत टोमॅटोची शेती शेततळी नजरेस पडत आहे. आपण नाशिक जिल्ह्यात आहोत की इतर दुसऱ्या डोंगराळ प्रदेशात असा प्रश्न इथे आल्यावर पडतो. 


टोमॅटो खुडण्याचे काम जोमाने सुरू


जेव्हा टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती. मातीमोल भावाच्या टोमॅटोचा लाल चिखल झाला होता. तेव्हाही शेतकरी डगमगला नाही, एप्रिलपासून टोमॅटोची लागवड केली आणि आता किलो मागे 150/160 रुपये भाव घेतला. 20 किलोच्या क्रेटला आधी 200/400 रुपये भाव मिळायचा. आज त्याच क्रेटसाठी 2100 /2200 रुपये दर मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज कमी झाले. काहींचा सातबारा कोरा झाला तर काहींना भविष्यसाठी भांडवल उभं राहिलं. शेतात आजही टोमॅटो खुडण्याचे काम जोमाने सुरू आहे. दोन पैसे जास्त मिळत असल्याने शेतकरी आंनदी आहे. मात्र दोनशे पाचशे रुपयांसाठी व्यापाऱ्यांच्या दारात जाणार शेतकरी ते करोडपती शेतकरी हा प्रवास सोपा निश्चितच नव्हता. 


शून्यातून विश्व निर्माण केलंय


कायमच अस्मानी सुलतानी संकटाचा सामना शेतकरी वर्ग करत होता. मागील वर्षी तर अनेकांची पीक अतिवृष्टीमुळे अक्षरशः वाहून गेली होती. आता उत्पन्न मिळाल्याने गावातीलच काहींनी अभिनंदनाचे बॅनर लावले. मात्र जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसल्याने बॅनर हटवून टाकले. आता उच्च शिक्षित तरुण पिढीही शेतीत हातभार लावत असल्यानं नवनवीन प्रयोग केले जात आहेत. येणाऱ्या संकटा समोर न झुकता शेतकऱ्यांनी धाडस दाखवले जिद्द सोडली नाही, शून्यातून विश्व निर्माण केलंय, त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही छोट्या छोट्या संकटापुढे खचून न जाता जिद्द कायम ठेवली तर सुगीचे दिवस नक्कीच येतील याची प्रेरणा धुळवडचे शेतकरी देत आहेत..


ईतर संबधित बातम्या : 


Viral Banner News : टोमॅटोमुळे कुणी 'कोट्यधीश' तर कुणी 'लखपती'! नाशिकच्या शेतकऱ्यांनी लावलेल्या बॅनरची राज्यभर चर्चा