नाशिक : गणपती, नवरात्र,दसरा आणि दिवाळी या सणांच्या काळात मिठाई (sweets) तसेच दुग्धजन्य पदार्थांची (milk products) मोठी मागणी असते. याच काळात अन्नपदार्थात भेसळीच्याही अनेक घटना समोर येत असतात. मागील 2 ते 3 महिन्यापासून अन्न आणि औषध प्रशासन विभाग (Food and Drug Administration) सतर्क झाला असून एक धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. अशीच एक मोठी कारवाई करत तब्बल 397 किलो बनावट पनीर ( Adulterated Paneer) हस्तगत करण्यात अन्न व औषध प्रशासनाला यश मिळाले आहे. नाशिक शहरातील त्रिमूर्ति चौक आणि अंबड परिसरात दोन ठिकाणी छापा टाकून बनावट पनीर ताब्यात घेण्यात आले आहे. या पनीरची किंमत 84 हजार रुपयांच्या घरात आहे.
बुधवारी नवीन नाशिक विभागातील त्रिमूर्ति चौकातील मे. विराज एंटरप्राइजेस या ठिकाणी छापा टाकून 74 किलो तर गुरुवारी अंबड परिसरातील साईग्राम कॉलनी येथील मे.साई एंटरप्राइजेस येथून तब्बल 323 किलो बनावट पनीर हस्तगत करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी हस्तगत करण्यात आलेले एकूण 397 किलो पनीराचे अन्ननमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून बाकी साठा नष्ट करण्यात आला आहे.
सणासुदीच्या काळात मिठाई तसेच दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असते. वाढलेल्या मागणीचा फायदा घेण्याच्या उद्देशाने अन्न पदार्थात भेसळीला देखील मोठे पेव फुटत असते. अन्न आणि औषध प्रशासन तसेच पोलिस प्रशासन देखील भेसळखोरांवर बारीक लक्ष ठेऊन असते. मागील काही महिन्यात नाशिकसह राज्यभरात झालेल्या अनेक कारवायांमध्ये कोटींवधीचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातच सिन्नर तालुक्यात तर चक्क बनावट दूध बनवण्यात येत असल्याची धक्कादायक बाब काही महिन्यापूर्वी उघडकीस आली होती. अशीच अजून एक धक्कादायक भेसळखोरी उघडकीस आली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर तब्बल 397 किलो बनावट पनीर हस्तगत करण्यात आलेआहे. अन्न आणि औषध प्रशासनाने सलग दोन दिवस टाकलेल्या छाप्यात ही मोठी कारवाई केली आहे. नाशिक शहरातील अंबड आणि त्रिमूर्ति चौक या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात हा मोठा बनावट पनीरचा साठा हस्तगत करण्यात आला.
मागील दोन महिन्यांपासून गणपती, नवरात्र, दसरा तसेच दिवाळीच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन सतर्क झाला आहे. मागील दोन महिन्यापासून प्रशासनाकडून धडक मोहिमेला सुरवात करण्यात आलीये. या मोहिमेच्या अंतर्गत गुप्त वार्ताहारांच्या मदतीने भेसळखोरांवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच, विविध ठिकाणी अचानक अचानक छापे टाकून अन्न नमुने ताब्यात घेतले जात आहेत. याच अंतर्गत गुप्त वार्ताहारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी त्रिमूर्ति चौकातील मे. विराज एंटरप्राइजेस तर गुरुवारी अंबड येथील साईग्राम कॉलनी येथील मे. साई एंटरप्राइजेस याठिकाणी छापा टाकून बनावट पनीर हस्तगत केले आहे. वरील दोन्ही ठिकाणावरून अनुक्रमे 74 आणि 323 किलो बनावट पनीर हस्तगत करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त म.मो.सानप आणि वि.पा. धवड यांच्या नेतृत्वात सुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील, अविनाश दाभाडे, नि. खं. साबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
प्रशासनाचे आवाहन
नागरिकांनी दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना खरच त्यामध्ये दूध, मलाई, खवा आहे का याची खात्री करावी. त्यासोबत विक्रेत्यांनीही दुग्धजन्य पदार्थच विक्री करावे. कुठला पदार्थ दुग्धजन्य नसल्यास तसे स्पष्ट शब्दात लिहावे. यासह हॉटेल चालकांनी बनावट पनीरचा वापर अन्न पदार्थ बनवताना करू नये, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. यासह नागरिकांना कोणत्याही अन्न पदार्थाच्या दर्जा बाबत कोणताही संशय असल्यास त्यांनी 1800 222 365 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
बनावट पनीर कसे ओळखाल
पनीर अस्सल कि बनावट ओळखण्यासाठी पाण्यात टाकून थोडा वेळ उकडा. थोडे थंड झाल्याने त्यात सोयाबीन किंवा तूर डाळीचे पीठ टाकून 10 मिनिटांसाठी ठेवा. जर 10 मिनिटानंतर या पनीरचा रंग फिकट लाल होत असेल तर समजा की तुमचे पनीर बनावटी आहे. लाल रंग होण्याचा अर्थ असा की बनावटी पनीर डिटर्जंट किंवा युरियाने बनवले गेले आहे.