नाशिक : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने (Nashik Rain) दमदार एन्ट्री केली आहे. नाशिकसह जिल्हाभरात पावसाने सुरुवात केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वदूर असलेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरले. मात्र दिंडोरी तालुक्यात (Dindori) हृदययद्रावक घटना समोर आली आहे. पावसामुळे एका जुन्या कंपनीच्या खोलीचा काही भाग घरावर कोसळून आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील नळवाडपाडा येथे घडली आहे. 


गेल्या दोन महिन्यांपासुन दडी मारलेल्या पावसाने (Nashik Rain Update) अखेर नाशिकरांवर आभाळमाया केली. नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला आहे. काल रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या पावसात एका जुन्या कंपनीच्या खोलीचा काही भाग घरावर कोसळून आजोबा आणि नातवाचा मृत्यू (Death) झाला. दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा गावात रात्री बारा वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. आजी, आजोबा आणि नातू घरात झोपलेले असताना प्रकार घडला. यात आजीबाईंना सुखरूप बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. 


गुरुवारी पहाटे पासून दिंडोरी तालुक्यात पाऊस सुरू असून नळवाडपाडा शिवारातील इंडो फ्रेंच कंपनीच्या जुन्या काही खोल्या आहेत. त्या शेजारी गुलाब वामन खरे यांचे घर आहे. खरे हे रात्री नेहमी सदर खोलीत पत्नी विठाबाई गुलाब खरे, नातू निशांत विशाल खरे यांच्या समवेत राहत होते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास तिघे झोपलेले असताना अचानक सदर खोलीचे छत कोसळल्याने त्याखाली ते दाबले गेले. (Slab Collapsed) शेजारी त्यांच्या मुलाला आवाज येताच त्यांनी तिथे बघितले असता त्यांना आई वडील मुलगा छताखाली दाबल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने सरपंच हिरामण गावित आणि ग्रामस्थांना कळवले. सरपंच यांनी तातडीने सर्कल तलाठी यांना कळवत मदत मागवली.


यानंतर काही वेळात जेसीबी साहाय्याने तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पहाटे चारच्या सुमारास सरपंच हिरामण गावित, शिपाई बाळू गवळी आणि ग्रामस्थांनी आत जात तिघांना बाहेर काढले. त्यात आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला होता, तर जखमी आजी विठाबाई यांना सुखरूप बाहेर काढत त्यांना दवाखान्यात नेले. सर्कल अमोल ढमके, तलाठी गिरीश बोंबले, ग्रामसेविका ललिता खांडवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सदर कुटुंबाला मदत मिळवूनदेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik Rain : दिलासा! नाशिकसह जिल्ह्यात पावसाचे दमदार कमबॅक, रात्रीपासून जोरदार, शेतीपिकांना जीवदान