नाशिक : गिरणा सहकारी साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी 178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी सामनामधून केला होता. वृत्तपत्रातून चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप करत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर मालेगावच्या  (Malegaon) अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.


शिवसेना फुटीनंतर मालेगावमध्ये मे 2023 मध्ये उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली . यावेळी संजय राऊतांनी गिरणा साखर कारखान्यात मोठा घोटाळा झाल्याची भुसेंवर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्याचबरोबर सामनातून देखील गिरणा सहकारी साखर (Girana Sugar Factory) कारखान्यात कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्यावर केला होता. त्यानंतर दादा भुसे यांनी काही दिवसाचा अवधी देत संजय राऊतांना हे आरोप सिद्ध करण्याचे आव्हानही दिले होते. मात्र त्यानंतर आता दादा भुसे यांनी थेट कोर्टात धाव घेत संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. वृत्तपत्रातून चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप करत मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आल्याने  खळबळ उडाली आहे. 


दरम्यान जेष्ठ विधीज्ञ सुधीर अक्कर (Sudhir Akkar) यांच्यामार्फत दाखल केलेल्या या फौजदारी खटल्यात मंत्री दादा भुसे यांची जन सामान्यांमध्ये प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने सामना या वर्तमानपत्रातून बदनामी केल्याने आरोप खासदार संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. यापूर्वी खासदार राऊत यांच्या मुंबई व दिल्ली येथील निवासस्थानी केलेल्या आरोपांबाबत पुरावे व खुलासा देण्याबाबत नोटीस बजावली होती. मात्र राऊत यांच्याकडून कुठलेही उत्तर त्या नोटीसिस प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे सामना या वृत्तपत्राचे कात्रण व इतर पुरावे जोडून हा खटला दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या खटल्या संदर्भात खासदार संजय राऊत यांना 23 ऑक्टोबरला मालेगाव येथील मे. न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. 


काय आहे नेमकं प्रकरण? 


गिरणा सहकारी साखर कारखान्याचा लिलाव थांबविण्यासाठी दादा भुसे यांनी गिरणा बचाव समिती स्थापन केली. कारखाना वाचविण्यासाठी निधी उभारण्यासाठी पुढे येण्याचे जाहीर आवाहन केले. मालेगावातील प्रतिष्ठत व्यक्ती, शेतकरी, मजूर हे या भावनिक आवाहनाला बळी पडले. गिरणा मोसम शुगर अॅग्रो अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नावाने हजारो लोकांकडून शेअर्ससाठी पैसे जमा करून 178 कोटी 25 लाख 50 हजार 10 रुपये या शुगर ऍग्रोचे प्रवर्तक, प्रभारी दादा भुसे यांनी हडपले, असा आरोप जाहीर सभेत ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांनी केला होता.  त्यानंतर संजय राऊत ट्विटरव सामानातून या प्रकरणावर प्रकाश टाकत कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी थेट कोर्टात खेचले आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Sanjay Raut : राहुल गांधींच्या प्रश्नावर पंतप्रधानांनी खुलासा करावा; चीनी घुसखोरीवर खासदार संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा