नाशिक : नाशिकमधून (Nashik) 300 कोटींहून अधिकचे ड्रग्स जप्त करण्यात आलेले असताना आता मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) पाठोपाठ नाशिक पोलिसांनी देखील ड्रग्ज संदर्भातली (Drug Racket) मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल देखील या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून राज्यभरात नाशिकमधून ड्रग्ज पुरवठा केला जात होता की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
नाशिक येथील ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) पुण्यातील ससून रुग्णालयातून (Sasun Hospital Pune) फरार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साकीनाका पोलिसांनी नाशिकच्या (Nashik) शिंदे गावात एमडी हा अंमली पदार्थ (MD Drug) तयार होणारा कारखाना उध्वस्त करून जवळपास 300 कोटींचा साठा ताब्यात घेतला होता. त्यामुळे नाशिक पोलिसांच्या (Nashik Police) कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. मात्र मुंबई पोलिसांच्या कारवाईला काही तास उलटत नाही तोच नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने शिंदे गावातील एका हॉटेल जवळ असलेल्या जाधव नामक व्यक्तीच्या गोडाऊनवर छापा टाकून एमडी ट्रक व कच्चा माल जप्त केला आहे. या कारवाईने नाशिकमध्ये ड्रग्जचे मोठे रॅकेट असल्याची शक्यता समोर येत आहे. नाशिकरोड पोलिसांच्या पथकाने पुन्हा त्याच गावात एका कारखान्यात ड्रग्स व काही कच्चा माल जप्त करून कारखाना उध्वस्त केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणाऱ्या ड्रग्जचा नाशिकच्या भागातून पुरवठा होत होता की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने नाशिक गाठले. या परिसरात तपास सुरु असताना शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शिंदे गावात (Shinde Village) ड्रग्जची फॅक्टरीच सापडली. ज्या फॅक्टरीमध्ये एमडी ड्रग्जची निर्मिती केली जात होती. शेकडो कोटी रुपयांचं ड्रग्स आणि ड्रग्जसाठी लागणारा कच्चा माल जप्त करण्यात आलेला होता आणि दुसऱ्याच दिवशी शिंदे गावांमधील जिथे अगदी हाकेच्या अंतरावर रहिवाशी वस्ती आहे, अशा ठिकाणी एक शेड टाकण्यात आलेल होता. त्या शेडमध्ये ड्रग्जचा आणि त्याचबरोबर ड्रग्जसाठी लागणाऱ्या विविध रसायनांचा कच्च्या मालाचा मोठा साठा जमा करण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले. तो साठा नाशिक पोलिसांनी जप्त केला असून नवीन एक अड्डा तयार करण्यात आलेला होता, तो देखील वरिष्ठ पोलिसांच्या आदेशानुसार नष्ट करण्यात येत आहे.
नाशिक हे ड्रग्जचे उगमस्थान आहे का?
एकूणच या फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रसायन होती, ती रसायन एकत्रित केली जात होती, त्याचं मिश्रण केलं जात होतं आणि त्याच्या माध्यमातून ड्रग्जची निर्मिती केली जात होती. नाशिक पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार शेकडो कोटी रुपयांचा साठा असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे आता केवळ हेच एक ठिकाण आहे का आणखी कुठे कुठे अशा स्वरूपाचे ड्रग्ज ठेवण्यात आलेले आहेत. राज्यभर जे ड्रग्जचे जाळ पसरलेले आहे, त्याचं उगमस्थान हे नाशिक आहे का? हा ही प्रश्न उपस्थित होतो आहे. मुंबई, पुणे सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये ड्रग्ज वितरण होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. ड्रग्ज माफिया म्हणून ओळख असलेला ललित पाटील हा चार दिवसापासून पुणे पोलिसांच्या हातातून पसार झालेला आहे, त्याचा भाऊ नाशिकमध्ये ड्रग्ज निर्मिती करत होता. त्याच भावाच्या ड्रग्ज निर्मितीच्या मुंबई पोलिसांनी छापेमारी केली होती, आता त्याच्याच दुसऱ्या एका कारखान्यावर नाशिक पोलिसांनी धाड टाकली असून येथूनही लाखोंचा साठा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एकूणच नाशिक हे ड्रग्जचे उगमस्थान आहे का? नाशिकमध्ये ड्रग्ज निर्मिती केली जात आहे का? याचा शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण एक मोठं रॅकेट आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याची माहिती आता समोर आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :