नाशिक : नाशिक (Nashik) शहर सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनत पाहत असून गेल्या काही दिवसांत राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. आता भाजपच्या लोकसभा महाविजय अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे उद्या सोमवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची (BJP) रणनीती आखण्यासाठी हा दौरा असण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत अनेक नेत्यांनी नाशिकला (Nashik) भेट दिली असून यात शाखा उद्घाटन, मेळावे, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, आगामी निवडणुकांची रणनीती यावर भर दिला आहे. भाजपकडून मिशन 2024 चे रणशिंग (Misson 2024) नाशिकमधून फुंकले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर (Nashik Politics) येत आहेत. उद्या संपूर्ण दौरा पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, घर घर चलो अभियान राबविले जाणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या बावनकुळे यांच्या दौऱ्यांतर्गत लोकसभा निवडणूक तयारीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या सकाळी साडेआठ वाजता नाशिकजवळील सय्यद पिंपी येथे भाजप कार्यकर्त्या तनुजा घोलप यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर सय्यद पिंपरी येथून निघून साडेदहा 'वाजता त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर सकाळी सव्वा अकरा वाजता त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथे तीन विधानसभा अंतर्गत तीनशे प्रमुख बुथ वॉरिअर्सची एकत्रितपणे बैठक घेऊन दुपारी साडेबारा वाजता घर चलो अभियानात सहभागासह त्र्यंबकेश्वर येथील नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता नाशिक शहरात दाखल होणार आहेत. दुपारी अडीच वाजता शहरातील सिडको भागातील कामगार मेळाव्यात उपस्थित राहून कामगारांना संवाद साधणार आहेत. तर दुपारी साडेतीन वाजता गंगापूर रोड येथे तीन विधानसभेतील प्रत्येकी 100 याप्रमाणे 300 बुथ वॉरियर्सच्या बैठकीला संबोधित करणार आहेत.
नाशिकमध्ये घर घर चलो अभियान
त्यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेत लोकसभा महाविजय अभियान नेमकं कशासाठी याबाबत चर्चा करणार आहेत. सायंकाळी ५ वाजता सातपूर भागात घर घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. यात सातपूर कॉलनी येथील पोस्ट ऑफिस ते आनंद सर्कलपर्यंत घर घर चलो अभियानांतर्गत नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत. तर सायंकाळी सहा वाजे दरम्यान पंचवटी परिसरातील नाशिक पूर्व विधानसभेतील परिसरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार असून त्यानंतर ते धुळ्याकडे रवाना होणार असल्याची माहिती नाशिक भाजपकडून देण्यात आली आहे. दरम्यान नाशिक महानगर क्षेत्रासाठी भाजपने जाहीर केलेल्या कार्यकारिणीबाबत आठवडाभरापासून नाराजीचे वारे घुमत आहेत. त्याबाबतचे वास्तव प्रदेशाध्यक्षापर्यंतही यापूर्वीच पोहोचविण्यात आले आहे. अनायासे प्रदेशाध्यक्षच नाशिक दौऱ्यावर येत असल्याने शहरासह ग्रामीणच्या कार्यकारिणीतील निवडीबाबतचा रोष बावनकुळे यांच्या उपस्थितीत व्यक्त होण्याची चिन्हे आहेत.
इतर महत्वाची बातमी :