नाशिक : नाशिक मुंबई मार्गावर इगतपुरीजवळ दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. बॅरिकेड्स तोडून दुचाकी (Two wheelar Accident) थेट समोरील ट्रॅकवर आदळल्याने हा अपघात झाला. यात दोघांचा जीव गेला. या अपघातात मोटर सायकलवरील वैतरणा येथील समाधान देवराम भगत, सचिन कचरू पथवे हे दोघे जण जागीच ठार झाले. खंबाळे येथील भाऊ भगत हे जखमी झाले आहेत. ट्रिपलसीट असलेल्या मोटारसायकलस्वाराचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. दुचाकी थेट रस्त्यावरील बॅरिकेड्स तोडून समोरील ट्रकवर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीच्या चिंधड्या झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीमच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी टोलच्या रुग्णवाहिकेद्वारे दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. इगतपुरी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. इगतपुरीजवळ साई कुटीरजवळ मोटरसायकलस्वाराचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या घटनेत मोटारसायकल बॅरिगेड तोडून पुढे चालणाऱ्या ट्रकवर पाठीमागून जाऊन जोरदार आदळली.
महामार्गावर सातत्याने अपघात
मुंबई-नाशिक मार्गावर सातत्याने अपघात घडत असतात. कधी चारचाकी वाहनांचे अपघात, तर कधी दुचाकी तर कधी मोठमोठे ट्रेलर या मार्गावरून जात असल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघाताची घटना घडत असते. तसेच या मार्गावर खड्डेही (Potholes) मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. यासाठी काही ठिकाणी वाहनांना माहितीसाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
मुंबई नाशिक महामार्ग बनला धोकादायक
नाशिकसह जिल्ह्यात अपघातांची (Accident) मालिका सुरूच असून मुंबई नाशिक मार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तसेच नाशिक-मुंबई मार्गावरील वाढती वाहतूक अपघातांना निमंत्रण देत असते. त्यामुळे सातत्याने या मार्गावर अपघात होत आहे. इगतपुरी शहरानजीक अधिक अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी इगतपुरी शहरातून येणारी वाहने, त्याचबरोबर महामार्गाची वाहने यामुळे अनेकदा वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. यातूनच अनेकदा अपघात होत असतात.
इतर महत्वाची बातमी :